जळगाव – घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 6,68,790 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुन्ना शहा सुलतान शहा, मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा आणि जाबीर शहा जावेद शहा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटकेतील तिघांविरुद्ध रामानंद, पारोळा, भुसावळ, जिल्हापेठ इत्यादी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
शिरसोली येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबटकर हे घरी नसतांना त्यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरफोडीचा गुन्हा करण्यात आला होता. राजेंद्र आंबटकर बाहेरगावाहून घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड फौजदार राजेंद्र उगले व गुन्हे शोध पथकातील उप निरीक्षक, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोकॉ रमाकांत साळुंखे, पो.काँ. नितीन ठाकुर, पो.काँ. गणेश ठाकरे, पोकॉ शशिकांत मराठे, पो. काँ योगेश घुगे आदींनी पुर्ण केला.






