जळगाव : आरटीओ कार्यालयात वाहनाच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी अपंग वकीलाकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, व्यवसाय—एजंट, खान्देश मोटर्स शोरूम, जळगाव, रा. आदर्शनगर, जुना आरटीओ परिसर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार हे ४२ वर्षीय खासगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूममधून मारुती कंपनीची अल्टो के-१० एचपीएसव्ही कार खरेदी केली होती. या वाहनाची आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करण्यासाठी तक्रारदार आरटीओ कार्यालयात गेले असता त्यांची भेट खासगी एजंट योगेश पाटील याच्याशी झाली.
एजंट योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांकडून वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ८ हजार ५०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकाराची तक्रार वकील महोदयांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
दरम्यान, जळगाव येथील इच्छादेवी चौक परिसरातील बजाज टी.के.एस. शोरूममध्ये संशयित योगेश पाटील याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच सापळा पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी उप निरीक्षक सुरेश पाटील, हवालदार सुनिल वानखेडे व पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.






