मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया – टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल क्रीडांगणावर

On: August 18, 2026 6:52 PM

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर सुरू झाली आहे. राज्यातील विविध भागांतून निवड झालेल्या एकूण ४० युवा महिला क्रिकेटपटू या निवड प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण करून त्यातून महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-20 संघाची निवड केली जाणार आहे.

निवड प्रक्रियेअंतर्गत १८ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दोन सराव असे एकूण सहासामने खेळविण्यात येत आहेत. या सामन्यांमध्ये खेळाडूंची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच सामन्यातील निर्णयक्षमता, फिटनेस आणि संघभावना या विविध बाबींचे मूल्यमापन केले जाणार आहे. सराव सामन्यांमधील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र संघासाठी गुणवंत खेळाडूंची निवड केली जाईल. हे सामने अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट क्रीडांगणावर सुरू असून, उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार मैदानामुळे खेळाडूंना चांगल्या वातावरणात सराव व सामने खेळण्याची संधी मिळत आहे.

राज्यातील युवा महिला क्रिकेटपटूंसाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वाची असून, महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सहा सराव सामने पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंचे ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत जळगाव येथे सराव शिबिर होणार आहे. या शिबिरात खेळाडूंना नियमित सरावासोबतच सामन्याच्या तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. संघातील खेळाडूंमध्ये समन्वय, संघभावना आणि सामन्याची रणनीती विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या महत्त्वपूर्ण निवड प्रक्रिया व सराव सामन्यांसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांचे सहकार्य लाभत आहे. जळगावमध्ये राज्यस्तरीय महिला क्रिकेटपटूंच्या निवड प्रक्रियेचे आयोजन झाल्याने जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी आणि युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या राज्यस्तरीय निवड प्रक्रिया व सराव शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे ठरत असून, जळगावला युवा महिला क्रिकेटच्या विकासाचे केंद्र म्हणूनही यामुळे नवी ओळख मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment