गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

On: August 22, 2026 6:51 PM

जळगाव, दि. २२ ऑगस्ट (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६’ मधील विजेत्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांचा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धे’चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील ८० तालुक्यांमधील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यंदा प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन तसेच डिजिटल जनजागृती या विषयांनाही स्पर्धेच्या मूल्यांकनामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले. सहभागी शाळांपैकी १७ जिल्ह्यांतील ४३ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या शाळेला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अंतिम मूल्यांकनासाठी निवड झालेल्या सर्व ४३ शाळांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही केवळ शाळेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घर, परिसर आणि समाजापर्यंत पोहोचावी, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. या समारंभास अप्पासाहेब पटवर्धन सफाई आणि पर्यावरण तंत्र निकेतन, देहू, पुणेच्या संचालिका डॉ. शिल्पा नारायणन तसेच जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभास विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment