जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वर कॉलनी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३१,२६,८००/- रुपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी दाम्पत्य आपल्या परिवारासह मध्य प्रदेशात देव दर्शनासाठी गेले असतांना घरफोडीचा प्रकार घडला होता. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे विशाल मुरलीधर दाभाडे आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. सखोल चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबुल करत मुद्देमाल काढून दिला.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठ, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे व सुभाष साबळे यांनी या तपासकामी सहभाग घेतला.







