नाशिक – राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सातपूर (नाशिक) येथील वरिष्ठ सहायकास दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामचंद्र नरसु माकरे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधिश अमित विनायक खारकर यांच्या न्यायालयाने रामचंद्र माकरे यास दोषी ठरवले आहे.
शासनाकडील मंजुर वैद्यकीय बिलाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी लाचखोर सहायक रामचंद्र माकरे याने तक्रारदाराकडे सुरुवातीला तिन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच स्विकारली होती. या प्रकरणी सातपुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक भारत तांगडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रदिप मैराळे, श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी व कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे यांनी या प्रकरणी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता शिरीक्ष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणीही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तकार नोंदवावी. जनतेच्या सोयीसाठी व तक्रार नोंदवण्यासाठी लॅड लाईन ते लँड लाईन व भ्रमणध्वनी ते लँड लाईन अशी टोल फि कमांक १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली आहे. नाशिक घटकाचा दुरध्वनी क्रमांक ०२५३-२५७५६२८, २५७८२३०, अहिल्यानगर घटकाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७, धुळे घटकाचा दुरध्वनी क्रमांक ०२५६२-२३४०२०, नंदुरबार घटकाचा दुरध्वनी क्रमांक ०२५६४-२३०००९, जळगाव घटकाचा दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३५४७७ असा आहे. नाशिक परिक्षेत्रीय कार्यालयाचा व्हॉट्सअॅप कमांक ९५४५६५१०६४ असा आहे.







