दारुड्या मुलाचा त्रास…त्याला दिला गळफास!… तिघांभोवती आवळला गेला कायद्याचा फास!

On: September 5, 2026 3:28 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : दिनांक ३१ जुलै २०२६…दुपारी दीड वाजेचा सुमार होता. जळगाव शहरापासून नजीक असलेल्या मोहाडी या गावातील रहिवासी नेहमीप्रमाणे आपल्या कामकाजात व्यस्त होते. मात्र या गावातील एका घरात असा वाद पेटला, ज्याचा शेवट एका २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूत परावर्तीत झाला. राधेशाम हरचंद राठोड असे या तरुणाचे नाव होते.

राधेशाम यास दारुचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे तो त्या दिवशी दारूच्या नशेतच घरी आला. घरच्यांकडे त्याने मागितले २० हजार रुपये. पैसे देण्यास नकार मिळाला…वाद वाढला. घरातील वस्तू फेकल्या जाऊ लागल्या. मारहाणीपर्यंत परिस्थिती पोहोचली. घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. आणि मग…एका दोरीने राधेश्यामचे आयुष्यच संपवले. पण ती दोरी त्याने स्वतः गळ्यात घातली होती? की दुसऱ्यांनी? हा प्रश्न त्यावेळी समाजापुढे आला नव्हता.

राधेश्याम याने घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी जगाला कथन केले. त्याला तातडीने जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पहिल्या नजरेत प्रकरण सरळ होते. एक तरुण…घरातील दोरी…गळफास…आणि मृत्यू. पोलिसांसमोरही सुरुवातीला आत्महत्येचीच शक्यता होती. पण मृतदेहाने मात्र एक वेगळीच गोष्ट सांगायला सुरुवात केली होती. मृतदेहाचा मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. मानेवर चंद्राकृती व्रण दिसत होता. मानेच्या मागील बाजूस, केसांच्या जवळही दोरीसदृश व्रण असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले.

वैद्यकीय अहवालात मानेवर दोरीचा दाब असल्याचे नमूद झाले. व्हिसेरा आणि नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले. तरीही…कुटुंबीयांची कहाणी बदलली नाही. “राधेश्यामने स्वतः गळफास घेतला.”

आई मीराबाई, वडील हरसिंग उर्फ हरचंद, भाऊ सचिन. तिघांनीही सुरुवातीला आत्महत्येचीच माहिती दिली आणि सांगितले—“आमची कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही.” प्रकरण जणू संपले होते. पण पोलिसांच्या तपासासाठी एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित होता…गळफासाची दोरी कुठे आहे? पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

राधेश्यामने ज्या दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले जात होते, त्या दोरीबाबत कुटुंबीयांकडे चौकशी झाली. उत्तर आले….. ती दोरी जाळून टाकली होती. राधेश्यामच्या अंत्यविधीनंतर त्याचे कपडे आणि गळफासाची दोरी जाळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी दोरी हजर करण्याबाबत राधेश्यामचा भाऊ सचिन याला आवर्जून लेखी समज दिली होती. पण…दोरी पोलिसांच्या हाती आलीच नाही. आत्महत्येच्या कथेतला एक महत्त्वाचा पुरावा आता कायमचा नष्ट झाला होता. तरीही कुटुंबीयांचे जबाब तेच होते—राधेश्यामने आत्महत्या केली.

दिवस पुढे जात होते. घड्याळाचे तिन्ही काटे आपआपल्या गतीने पुढे पुढे सरकत होते. ३१ जुलैची घटना आता काही दिवस मागे पडली होती. ७ ऑगस्ट रोजी राधेश्यामची आई, वडील आणि भावाचे पुन्हा जबाब नोंदविण्यात आले. तिघांची भूमिका कायम होती व ती म्हणजे राधेश्यामने केली आत्महत्या. आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही.

Baban Avhad Police Inspector

दरम्यान, तपासातील नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. दिनांक १८ ऑगस्ट रोजी व्हिसेरा सी.ए. नाशिक येथे पाठविण्यात आला. घड्याळाच्य काट्याप्रमाणे एमआयडीसी पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरत होती. पण पोलिस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह कर्मचारी वर्गाच्या मनात एकच प्रश्न होता—राधेश्यामचा मृत्यू नेमका कसा झाला?

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ हा दिवस या प्रकरणासाठी निर्णायक ठरला. शासकीय रुग्णालयातून पीएम नोट्स आणि वैद्यकीय अभिप्राय एमआयडीसी पोलिसांच्या हाती प्राप्त झाला. त्या अहवालातील एका निष्कर्षाने आतापर्यंतची संपूर्ण कहाणी संशयाच्या भोवऱ्यात आणली. वैद्यकीय अभिप्रायात नमूद करण्यात आले होते —“Ligature compression over neck – Mostly in favour of Strangulation.” म्हणजे मानेवर दोरीसदृश दाब होता आणि वैद्यकीय निरीक्षण गळा आवळण्याच्या शक्यतेच्या बाजूने अधिक झुकत होते. आता पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला—हा खरंच आत्महत्येचा फास होता? की…कोणीतरी दुसऱ्याने त्याच्या गळ्यात फास आवळला? त्यामुळे तपासाची दिशा बदलली.

मयत राधेश्यामच्या आईला बोलावण्यात आले. वडिलांना बोलावण्यात आले. भावालाही बोलावण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुन्हा चौकशी सुरू झाली. यावेळी पोलिसांचे प्रश्न वेगळे होते. घटना नेमकी कशी घडली? राधेश्याम दारूच्या नशेत का आला? त्याने २० हजार रुपये का मागितले? घरात नेमके काय झाले? आणि…गळफासाची दोरी जाळून का टाकली?

या सखोल आणि चक्रावून टाकणा-या चौकशीदरम्यान पोलिस तपासात राधेश्यामच्या मृत्यूची वेगळीच हकीगत समोर आली. राधेश्यामला दारूचे व्यसन होते. तो कामधंदा करत नव्हता. दारू पिण्यासाठी तो घरच्यांकडे पैसे मागत असे. पैसे मिळाले नाहीत की घरात वाद होत असे. मारहाण होत असल्याचेही मयत राधेश्यामच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

फ्लॅश बॅकमधे जातांना कुटूंबियांनी कथन केले की दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राधेश्याम दारूच्या नशेत घरी आला. त्याने मागितले—२० हजार रुपये. घरच्यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. वाद वाढला. वस्तू फेकल्या गेल्या. मारहाण झाली. आणि मग…राधेश्यामला तिघांनी मिळून पकडल्याचे पोलिस तपासात समोर आले. हीच या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

राधेश्यामला जमिनीवर झोपविण्यात आले. भावाने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले. आई त्याच्या पायांवर बसली. आणि…वडिलांनी घरातील दोरी त्याच्या गळ्यात टाकून गळफास दिल्याचे पोलिस तपासात कथितरीत्या समोर आले. काही क्षणांतच सगळे शांत झाले. पण त्या शांततेच्या मागे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर सुरू झाला…मृत्यूला आत्महत्येचे रूप देण्याचा कथित प्रयत्न.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, राधेश्यामने स्वतः गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना सांगितले. मयत राधेश्यामला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंचनामा झाला. शवविच्छेदन झाले. मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आणि त्यानंतर…गळफासाची दोरी आणि मृताचे कपडेही जाळण्यात आले. जणू मृत्यूमागचा एक महत्त्वाचा पुरावा कायमचा नष्ट झाला होता. पण…एक गोष्ट जाळता आली नाही. वैद्यकीय सत्य.

सुरुवातीला तिघांचे जबाब एकसारखे होते. “आत्महत्या.” नंतर पीएम अहवाल आला. वैद्यकीय अभिप्रायाने गळा आवळण्याची शक्यता व्यक्त केली. पुन्हा चौकशी झाली. आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावेळी तिघांकडून घटनेची वेगळी हकीगत समोर आली. आई मीराबाई, वडील हरसिंग उर्फ हरचंद, भाऊ सचिन या तिघांचाही कथितरीत्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आत्महत्येच्या नोंदीमागे दडलेले गूढ अधिक गडद झाले.

दिनांक ३१ जुलैला राधेश्यामचा मृत्यू झाला. त्या वेळी तो आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मानेवरील व्रण…गायब झालेली दोरी…दोरी जाळल्याची माहिती…आणि अखेरचा वैद्यकीय अभिप्राय…या सगळ्यांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांच्या तपासानुसार, राधेश्यामला त्याची आई, वडील आणि भावाने संगनमत करून गळफास देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. तसेच गळफासाची दोरी जाळून पुरावा नष्ट केल्याचा आणि आत्महत्येचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.

पण या घटनेमागे खरा प्रश्न कोणता? राधेश्यामला दारूचे व्यसन होते. दारूमुळे तो कुटुंबीयांना त्रास देत होता, असे तपासात सांगण्यात आले. पैशांवरून वाद होत होते. घरात हिंसक वातावरण निर्माण होत होते. पण…व्यसनाचा त्रास कितीही मोठा असला तरी हत्या हा त्यावरचा उपाय नाही. कायदा हातात घेणे हा कोणत्याही परिस्थितीत मार्ग नाही. दारूच्या व्यसनाधीन व्यक्तीला उपचाराची गरज असते. कुटुंबाला समुपदेशनाची गरज असते. धोका असेल तर पोलिसांची मदत घेण्याची गरज असते. पण संतापाच्या एका क्षणात घेतलेला निर्णय… संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

राधेश्यामचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा अंतिम निर्णय न्यायालय घेईल. पण या घटनेने एक प्रश्न समाजासमोर नक्कीच ठेवला आहे—दारूची बाटली घरात आली की भांडण सुरू होते पण त्या भांडणाचा शेवट मृत्यूच्या फासात होऊ नये, यासाठी आपण वेळेवर काय करतो? कारण… दारूची नशा काही तासात उतरते अथवा कमी होते. संताप काही मिनिटांत शांत होतो. पण…एका चुकीच्या निर्णयाचा फास आयुष्यभर आवळलेला राहू शकतो. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके तसेच पोलिस नाईक हेमंत जाधव, सुभाष साबळे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment