जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – तुषार सोनवणे हा अविवाहीत तरुण. भुसावळ शहरातील रहिवासी. रेल्वे कॅन्टीनमध्ये नोकरी. साधं आयुष्य जगणारा हा तरुण. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्याच नात्यात अडकला होता. एका विवाहित महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आले.

विवाहितेचा पती कामानिमित्त शहराबाहेर गेल्यानंतर दोघांची भेट होत असल्याची माहिती समोर आली आहे. ती विवाहीता आणि तुषार हे दोघे जण सुरुवातीला तिच्या पतीच्या गैर हजेरीत चोरुन लपून भेटत होते. त्या विवाहितेचा पती बाहेरगावी गेला म्हणजे दोघे उघड उघड भेटत होते. कधी कधी दोघे बाहेरगावी फिरायला जात असल्याचे म्हटले जाते. दोघांचे प्रेमाचे नाते काही काळ लपून राहिले. पण या नात्याची गोपनियता फार दिवस गुपीत राहिली नाही. एक दिवस तिच्या अल्पवयीन मुलाला या संबंधांची कुणकुण लागली. आणि इथूनच या कथेला धोकादायक आणि धक्कादायक वळण मिळालं. आईच्या नात्याचा अल्पवयीन मुलाला राग आला.

आपली आई आणि अविवाहीत तुषार यांच्यातील संबंध त्याच्या लक्षात आले. त्याला हे नातं अजिबात मान्य नव्हतं. आईच्या आयुष्यातील या संबंधामुळे त्याच्या मनात नाराजी निर्माण झाली. त्याची ही नाराजी हळूहळू रागात बदलली. आणि हा राग त्याच्या मनात साठत गेला. पण तुषारला या सगळ्याची किती कल्पना होती?
तुषारच्या घरात त्याच्या लग्नाचा विषय निघाला. तुषार विवाहयोग्य झाला होता. आई-वडिलांनी मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाल्याने त्याला लग्नाबाबत विचारलं. पण तुषारने वेगळंच उत्तर दिलं. “माझं एका महिलेसोबत प्रेम आहे…” ती महिला कोण? ती विवाहित आहे का? तुषारचं तिच्याशी नातं कसं आहे? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या पालकांनी त्याला विचारले.

तुषारने त्यांना त्या महिलेबाबत सर्व काही स्पषटपणे कथन केले. आणि याच चर्चेदरम्यान त्याने एक महत्त्वाची गोष्टसुद्धा सांगितली की त्या महिलेच्या मुलाला त्यांच्या संबंधांची माहिती आहे. ही माहिती पुढे या संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाचा धागा ठरली.
दिनांक 10 सप्टेंबर 2026 … साधा दिवस होता! या दिवसाची सकाळ झाली. तुषार नेहमीप्रमाणे कामावर गेला. रेल्वे कॅन्टीनमधील काम आटोपून तो दुपारी साधारण एक वाजता जेवणासाठी घरी आला. जेवण झालं. काही वेळ घरात थांबला. आणि पुन्हा दुपारी साडे तीन वाजता कामावर गेला. सगळं नेहमीसारखंच होतं. पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडणार होतं… सायंकाळी पाच वाजता… तुषार काम आटोपून पुन्हा घरी आला.

या दिवशी त्या विवाहितेचा पती नाशिक येथे गेला असल्याचे त्याला समजले. त्याची भीड चेपली होती. त्यामुळे तो तिच्या मुलासमक्ष तिला भेटण्यासाठी जात होता. त्याने तिच्या मुलाला मोटार सायकल घेऊन घरी बोलावले. तिच्या मुलाच्या मोटार सायकलवर डबलसिट बसून त्याच्याच घरी त्याच्या आईला भेटण्यास जाण्याचे तुषारने नियोजन केले होते.

काही वेळाने त्या विवाहितेचा अल्पवयीन मुलगा मोटार सायकल घेऊन तुषारजवळ आला. दोघांची भेट झाली. बाहेरून पाहणाऱ्याला हा साधा भेटीचा प्रसंग वाटला असेल. मात्र या भेटीमागे त्या अल्पवयीन मुलाच्या मनात वेगळेच कट कारस्थान सुरु होते. त्याने सोबत चाकू आणला होता.
“तू माझी बाइक चालव…” असे म्हणत अल्पवयीन मुलाने तुषारला मुद्दाम आपली दुचाकी चालवण्यास दिली. तुषार पुढे बसला. तो मुलगा मागे बसला. दुचाकी सुरू झाली. दोघे पुढे निघाले. तुषारच्या मनात कदाचित ही केवळ एक भेट होती. पण पोलिस तपासानुसार मागे डबलसिट बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या मनात मात्र तुषार विषयी प्रचंड राग साचला होता. आणि पुढच्या काही मिनिटांत त्या दुचाकीवरील प्रवासाचा शेवट रक्तरंजित होणार होता.

घराच्या परिसराकडे जात असताना अचानक तुषारवर मागून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. क्षणभरात परिस्थिती बदलली. तुषार दुचाकीवरून नियंत्रण गमावून खाली कोसळला. रस्त्यावर पडलेल्या तुषारला काय घडलं, हे समजण्याची संधीही मिळाली नाही. हल्ल्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगा तेथून पसार झाला. काही क्षणांपूर्वी जिवंत असलेला तुषार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ आपल्या सहका-यांसह घटनास्थळी हजर झाले. काही वेळाने डिवायएसपी केदार बारबोले यांनी देखील घटना स्थळाला भेट दिली. घटनास्थळी तुषारचे नातेवाईक देखील पोहोचले. उपचारांपूर्वीच तुषारचे निधन झाले होते.


आक्रोश…गोंधळ…आणि आपल्या माणसाला जखमी अवस्थेत पाहून नातेवाईकांवर कोसळलेलं दुःख व्यक्त केले जाऊ लागले. भुसावळ शहरात या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांसमोर आता एकच प्रश्न होता—तुषारवर हल्ला कोणी केला? आणि का? दरम्यान तुषारच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

तुषारच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती गोळा करण्यात आली. त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासण्यात आली. फोनवरील संपर्क तपासण्यात आले. तुषारच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपासाची दिशा बदलली…तुषारचे एका विवाहित महिलेसोबत असलेले कथित प्रेमसंबंध…त्या महिलेच्या मुलाला या संबंधांची असलेली माहिती…दिनांक 10 सप्टेंबरला झालेला फोन…तुषारची भेट…आणि त्यानंतर झालेला हल्ला…हे सगळे धागे पोलिसांनी एकत्र जोडण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान त्या महिलेच्या अल्पवयीन मुलावर संशय बळावला. पोलिस पथकाने त्याचा शोध घेतला. आणि अखेर अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले. कायद्याच्या मर्यादेनुसार त्याची ओळख जाहीर करण्यात आली नाही.
या प्रकरणात पोलिस तपासानुसार प्रेमसंबंध हा हल्ल्यामागील प्रमुख कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण या घटनेने काही गंभीर प्रश्न समाजासमोर ठेवले आहेत. एका विवाहित महिलेचे कथित प्रेमसंबंध…त्या संबंधांची माहिती असलेला अल्पवयीन मुलगा…त्याच्या मनात निर्माण झालेला राग…आणि हिंसेत बदललेला त्याचा तो राग. एका क्षणाच्या निर्णयाने तुषारचं आयुष्य संपलं. पण त्यासोबत आणखी कित्येक आयुष्यं उद्ध्वस्त झाली. ही फक्त हत्या नाही… हा इशारा आहे! या घटनेकडे केवळ गुन्हा म्हणून पाहून थांबता येणार नाही. कुटुंबातील नात्यांमध्ये काहीतरी बिनसलं असेल, तर ते मुलांच्या लक्षात येतं. पण मुलांच्या मनात त्या परिस्थितीचा काय परिणाम होतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.
रागाला संवादाची दिशा मिळाली नाही, तर तो विनाशाचा मार्ग पकडू शकतो. कौटुंबिक वाद असो… प्रेमसंबंध असो…विश्वासघाताची भावना असो…किंवा नात्यांमधील मतभेद असोत…हातात शस्त्र घेणे हा कधीच उपाय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या मनात तणाव, राग किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमात निर्णय चुकू शकतात. नात्यांमध्ये मतभेद होऊ शकतात… पण त्या चुकांची शिक्षा मृत्यू नसते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि संपूर्ण घटनाक्रम तपासातून अधिक स्पष्ट होणार आहे.








