जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : दिनांक 3 ऑगस्टची ती सकाळ… सकाळी आठ वाजेची वेळ…… पारोळा तालुक्यातील करंजी बु. गावात दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. गावातील रस्त्यांवर नेहमीची लगबग होती. कुणी शेताकडे निघाले होते, कुणी कामाच्या तयारीत होते. पण एका घरात मात्र काही वेळातच अशी शांतता पसरली, जी पुढील चाळीस दिवस संपूर्ण कुटुंबाला अस्वस्थ करून ठेवणार होती.

त्या घरात एकट्याच राहणाऱ्या 85 वर्षीय वैजंताबाई गणपत माळी अचानक दिसेनाशा झाल्या. वयाच्या या टप्प्यावर त्या कुठे जाणार? कुणाला न सांगता घराबाहेर का पडतील? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे …… त्या गेल्या तरी कुठे?
सुरुवातीला कदाचित कुणालाही वाटले नसेल की हा प्रश्न इतका गंभीर आहे. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. गावात चौकशी झाली. ओळखीच्या ठिकाणी विचारपूस झाली. पण वैजंताबाईंचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी त्यांच्या चुलत पुतण्याने भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांनी पोलिसांना माहिती दिली.

दिनांक 9 ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली. पण पोलिसांच्या तपासासमोर एक महत्त्वाची बाब होती—वैजंताबाईंच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने होते. वृद्ध महिला…… एकट्या राहणाऱ्या…… अचानक बेपत्ता…… आणि अंगावर मौल्यवान दागिने. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि तपासाची दिशा बदलली. हे केवळ बेपत्ता होण्याचे प्रकरण आहे का? की यामागे एखादे षड्यंत्र आहे?
संशयाची पहिली सावली पडली आणि पारोळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली.
एका पथकाचे लक्ष्य होते—संशयिताचा शोध. तर दुसऱ्या पथकासमोर प्रश्न होता—वैजंताबाई कुठे आहेत? तपास सुरू झाला. पारोळा ते धुळे….अमळनेर ते जळगाव…… मुक्ताईनगर ते यावल. रस्ते तपासले जाऊ लागले. वाहने तपासली जाऊ लागली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण सुरू झाले. आणि मग तपास पथकाला मिळाला एक छोटासा, पण अत्यंत महत्त्वाचा धागा…
3 ऑगस्टचा दिवस उजाडला. सकाळी सव्वा सात वाजून सोळा मिनीटांनी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती दिसत होती. तो अनोळखी नव्हता. तो होता वैजंताबाईंचा सख्खा भाचा—प्रशांत उत्तम माळी, वय चाळीस. तो वैजंताबाईंच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना दिसत होता. काही मिनिटांनंतर घटनाक्रमाने वेगळे वळण घेतले. वैजंताबाई एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायरमध्ये बसून पारोळ्याच्या दिशेने जाताना दिसल्या. त्यानंतर…वैजंताबाई पुन्हा कुठल्याही कॅमेऱ्यात सहज दिसत नव्हत्या.
पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली—प्रशांत त्या सकाळी वैजंताबाईंकडे का आला होता? वैजंताबाई त्याच्यासोबत का गेल्या? गाडी कुठे गेली? आणि त्या गाडीतून गेल्यानंतर त्यांचे काय झाले? संशय आता हळूहळू एका दिशेने सरकत होता. पण पोलिसांसाठी संशय पुरेसा नव्हता. पुरावा हवा होता. 150 कॅमेरे… हजारो क्षण… एका सत्याच्या शोधासाठी तपास पुढे पुढे सरकू लागला.
तपास पथकाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. प्रत्येक फुटेज म्हणजे एखाद्या कोड्याचा तुकडा. एक गाडी कुठून आली? कुठे वळली? कोणत्या रस्त्याने गेली? कुठे थांबली? या सगळ्यांची सांगड घातली जात होती. दरम्यान दुसरीकडे तांत्रिक विश्लेषणही वेगाने सुरू होते. तपास पथकांनी सुमारे 250 किलोमीटरच्या परिसरात हालचालींचा माग काढला. पारोळा…करंजी…अमळनेर…धरणगाव…घाडोदे…मुक्ताईनगर…यावल…जळगाव…
संशयिताचा शोध घेताना पथक पारोळा, दळवेल, मुकटी, फागणे, धुळे आणि चाळीसगाव परिसरात पोहोचले. दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. घड्याळाची काटे पुढे पुढे सरकत होते. एक आठवडा गेला……दोन आठवडे गेले. तरीही वैजंताबाईंचा ठावठिकाणा लागत नव्हता. तपास मात्र थांबला नव्हता. चाळीस दिवस… एक वयोवृद्ध महिला बेपत्ता होती. आणि पोलिसांच्या मनात एकच प्रश्न—त्या जिवंत आहेत की…?
चाळीस दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी प्रशांत माळीला ताब्यात घेतले. आता तपासाचा सर्वात निर्णायक टप्पा सुरू झाला. चौकशीने वेग घेतला होता. प्रश्नांवर प्रश्न विचारले गेले. वैजंताबाई कुठे आहेत? तीन ऑगस्टला त्यांच्यासोबत काय झाले? त्या कारमध्ये का बसल्या? गाडी कुठे गेली? प्रशांतची उत्तरे तपासली जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तपास पथकाकडे आता सीसीटीव्ही फुटेज होते. तांत्रिक माहिती होती. वाहनांच्या हालचालींचे धागे होते. आणि त्याच्या कथनातील विसंगती तपासली जात होती.
हळूहळू चौकशीचा फास आवळत गेला. आणि अखेर पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रशांतने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलेली कहाणी धक्कादायक होती. कारमध्ये बसवण्यासाठी सांगितले… एक खोटं कारण प्रशांतवर मोठे कर्ज असल्याचे तपासात समोर आले. यापूर्वी त्याने मावशी वैजंताबाईंकडून पैसे घेतले होते. पुन्हा पैशांची गरज निर्माण झाली होती. पण वैजंताबाईंनी आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्याच वेळी त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर त्याची नजर गेल्याचा पोलिसांचा दावा आहे. आणि मग कथित कटाची सुरुवात झाली.
3 ऑगस्टच्या सकाळी त्याने वैजंताबाईंना सांगितले—शिरसोली येथे एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. तिथे जायचे आहे. वृद्ध वैजंताबाईंनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या एका भाड्याच्या कारमध्ये बसल्या. गाडी क्रमांक—MH 19 BJ 0071. गाडी सुरू झाली. करंजी मागे पडले. पुढे रस्ते बदलत गेले. आणि वैजंताबाईंच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास सुरू झाला. दिवसभराचा प्रवास… पण गंतव्य कुठेच नव्हते
पोलिसांच्या तपासानुसार प्रशांतने वैजंताबाईंना दिवसभर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात गाडीतून फिरवले. या दरम्यान तो त्यांच्या दागिन्यांची मागणी करत होता. पण वैजंताबाई दागिने देण्यास तयार नव्हत्या. एकीकडे दिवस संपत होता. संध्याकाळ सरत होती. रात्र झाली. पण गाडीचा प्रवास थांबत नव्हता.
आणि मग…4 ऑगस्टची पहाट जवळ येत असताना गाडी धुळे परिसरातील नंदाळे फाट्याजवळील हायवेवर थांबली. घड्याळात साधारण रात्रीचा दिड वाजला होता. हायवेवर अंधार…… आजूबाजूला शांतता. गाडीत एक वयोवृद्ध महिला आणि तिच्यासोबत तिचाच जवळचा नातेवाईक. याच ठिकाणी पोलिसांच्या तपासानुसार प्रशांतने रुमालाने गळा आवळून वैजंताबाईंचा खून केला. एक विश्वास तिथेच संपला.
पण गुन्ह्याची कहाणी अजून संपलेली नव्हती. कारण आता प्रशांतसमोर दुसरा प्रश्न होता—मृतदेह लपवायचा कुठे? खून केल्यानंतर मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर प्रशांत घरी परतला. पण मृतदेह कायम गाडीत ठेवणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी 4 ऑगस्टच्या संध्याकाळी, त्याने जळगाव शहरालगतचा रस्ता गाठला. कानळदा फाटा सर्व्हिस रोड…..रस्त्याच्या कडेला असलेली सिमेंटची चारी……आणि त्या चारीत…वैजंताबाईंचा मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा दावा आहे. यानंतर दागिने घेऊन तो निघून गेला. कदाचित त्याला वाटले असेल— आता कुणालाही सत्य कधीच कळणार नाही.
पण त्याला माहीत नव्हते की त्याच्या मागे काहीतरी राहिले आहे. सीसीटीव्हीचे फुटेज….तांत्रिक पुरावे….गाडीचा प्रवास…..आणि सर्वात महत्त्वाचे—पोलिसांचा चाळीस दिवसांचा अथक तपास. चाळीस दिवसांनी… ती चारी पुन्हा उघडली. प्रशांतच्या चौकशीतून पोलिसांना कानळदा फाट्याजवळील जागेची माहिती मिळाली. तपास पथक तिथे पोहोचले. शोध सुरू झाला.
आणि अखेर…चाळीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वैजंताबाईंचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. ज्या वयोवृद्ध महिलेचा शोध कुटुंबीय घेत होते…जिच्यासाठी पोलिसांनी तब्बल 150 सीसीटीव्ही फुटेज तपासले… जिच्यासाठी पथकांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला…तिचा शेवटचा ठावठिकाणा अखेर सापडला.
करंजी बु.च्या घरातून सुरू झालेला प्रश्न…“वैजंताबाई कुठे गेल्या?” चाळीस दिवसांनी त्याचे उत्तर मिळाले. पण ते उत्तर अत्यंत वेदनादायक आणि तेवढेच धक्कादायक देखील होते. मृतदेह सापडल्यानंतर तपासाची आणखी एक महत्त्वाची बाजू समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार प्रशांतने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याचे सांगितले आहे. तर उर्वरित दागिने फागणे, धुळे परिसरात लपवल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता पोलिसांकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
याशिवाय या गुन्ह्यात खुनाचे आणि पुरावा नष्ट करण्याचे संबंधित कलम वाढविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. सुरुवातीला पारोळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२०२६ अन्वये BNS कलम १३७(२) आणि १४२ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे—वैजंताबाईंनी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याच नातेवाईकावर त्यांच्या हत्येचा आरोप आहे. एका 85 वर्षीय महिलेचा शेवट… एका खोट्या कारणाने सुरू झालेल्या प्रवासात झाला. पैशांची गरज…..दागिन्यांचा मोह….जवळच्या नातेवाईकाचा विश्वास….. आणि त्यानंतरचा कथित खून… पण गुन्हेगाराला वाटलेला चाळीस दिवसांचा अंधार पोलिसांच्या तपासामुळे अखेर उजेडात आला. चाळीस दिवसांनी संशयित ताब्यात आला आणि अखेर मृतदेहही सापडला.
वैजंताबाई आता या जगात नाहीत. मात्र त्यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न, पुरावे आणि आरोपीविरुद्धचे आरोप आता न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणार आहेत. या थरारक तपासातून पुन्हा एकदा एक गोष्ट समोर आली—गुन्हा कितीही काळ लपवला, तरी एखादा छोटासा पुरावा कधीतरी सत्याचा दरवाजा उघडतोच. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अथक परिश्रम करून अत्यंत कौशल्याने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.







