जळगाव : नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीतील मोबाईल टॉवरच्या जनरेटर मधील डीझेल चोरी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या कब्जातून 65 लिटर चोरीचे डीझेल आणि पन्नास हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील चोरट्याने कबुल केलेल्या चार गुन्ह्यांची उकल देखील झाली आहे. समीर जानमोहम्मद तडवी असे यावल तालुक्यातील अकलुद येथील चोरट्याचे नाव आहे.
अटकेतील चोरटा हा यापुर्वी या मोबाईल टॉवरवर डीझेल भरण्याचे काम करत होता. त्यामुळे त्याला या परिसराची चांगल्या प्रकारे माहिती होती. खर्डी, कडगाव, भादली रेल्वे गेट आणि आसोदा परिसरातील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधील एकुण 920 लिटर डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे सर्व गुन्हे अटकेतील समीर तडवी याने केल्याचे त्याने कबुल केले आहेत. या गुन्ह्यांची नोंद नशिराबाद पोलिस स्टेशनला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी संशयास्पद हालचाली, चोरी किंवा इतर बेकायदेशीर प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ मिलिंद जाधव, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, अकरम शेख, विजय पाटील, सलीम तडवी, पोकॉ. मयुर निकम, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, ईश्वर पाटील, गौरव पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.






