काव्यरत्नावली चौकात साकारले ‘छत्रपतींचे प्रशासन’

On: September 24, 2026 10:55 AM

जळगाव : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि कार्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. दरम्यान मर्दानी खेळाने या उपक्रमाची रंगत वाढली., ही सजावट जळगावकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून जैन इरिगेशनच्या कला विभागाने ही सजावट साकारली आहे. ‘छत्रपतींचे प्रशासन, कार्यसंस्कृतीचे बिजारोपण’ या संकल्पनेवर आधारित या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय रचना, लोककल्याणकारी धोरणे आणि स्वराज्याची संकल्पना प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे.

काव्यरत्नावली चौकातील श्री गणेशाची जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, स्वरूप लूकंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

अष्टप्रधान मंडळ, जलव्यवस्थापन, रयतेच्या कल्याणाचा ध्यास..देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील अष्टप्रधान मंडळाची माहिती देण्यात आली आहे. पेशवा, अमात्य, वाकनवीस, दबीर, सचिव, पंडितराव, सर-ए-नौबत आणि न्यायाधीश या आठ प्रमुख पदांमार्फत प्रशासनाच्या विविध विभागांचे कामकाज चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन हे रयतेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवणारे होते, हा विचारही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. वतनदारी पद्धतीला आळा घालणे, सरदार व जहागीरदारांच्या खासगी सैन्याऐवजी राज्याच्या नियंत्रणाखालील सैन्यव्यवस्था निर्माण करणे. शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी व आवश्यक अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ‘तगाई’ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणे, अशी माहिती देखाव्यातून देण्यात आली आहे. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ हा प्रशासनातील शिस्तीचा, रयतेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा संदेशही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे.

जलव्यवस्थापनासाठी तलाव व धरणांची निर्मिती, रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार-वाणिज्याला प्रोत्साहन, किल्ल्यांची तटबंदी, कला-साहित्याला आश्रय, राजनैतिक संबंध, महिला सक्षमीकरण आणि कल्याणकारी उपाययोजना अशा विविध क्षेत्रांतील प्रशासनाची माहितीही येथे मांडण्यात आली आहे. स्वदेशी विचार आणि स्वराज्याची संकल्पना यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. लोकोभिमुख प्रशासनाची आदर्श पद्धत म्हणून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील विविध पैलू जगभरातील प्रजासत्ताक देशांनी अवलंबली आहे. ते प्रशासन प्रत्यक्ष अनुभवता यावेत आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने ही सजावट साकारण्यात आली आहे. जळगावकरांनी काव्यरत्नावली चौकातील या देखाव्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन अनुभवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment