बाकावरुन सुरु झाला वाद, प्रसंग झाला बाका! — तिघांच्या हल्ल्यात ज्ञानेश्वरला मृत्युच्या हाका !!

On: October 6, 2026 9:42 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क)– जामनेर तालुक्यातील कुंभारी गाव. या गावात नेहमीप्रमाणे 26 सप्टेबर 2026 रोजी सकाळ झाली. मात्र कुंभारी या गावात या दिवसाची सुरुवात एका वादाने झाली आणि त्यात एकाचा नाहक बळी गेला. सकाळची वेळ होती…घराच्या बाहेर नेहमीसारखीच लगबग सुरू होती. ज्ञानेश्वर मोरे यांच्या घराशेजारी ग्रामपंचायत कार्यालय…कार्यालयाच्या परिसरात नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेले काही बाक…या बाकांवर बसणारे गावकरी…आणि त्या ठिकाणी होणारे धुम्रपान. मोरे कुटुंबाला या सगळ्याचा त्रास होत होता. त्यातच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातही हे बाक अडथळा ठरत होते. म्हणून ज्ञानेश्वर मोरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे बाक हटवण्याची विनंती केली.

विषय एवढाच होता… काही बाक हटवायचे होते. पण 26 सप्टेंबरची सकाळ या कुटुंबासाठी आयुष्यभराची काळी सकाळ ठरणार आहे, याची कल्पना कुणालाही नव्हती. सकाळी अकरा वाजले… आणि वादाची पहिली ठिणगी पडली. कुंभारी गावात 26 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता बाक हटवण्याचे काम सुरू झाले. ग्रामपंचायत महिला सरपंचांचे पती हिरामन जोशी आणि ग्रामपंचायत शिपाई गणेश गोपाळ यांच्या परवानगीने व उपस्थितीत हे काम सुरू झाले.

ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यशही तेथे उपस्थित होते. बाक हलवले जात होते…तेवढ्यात तिथे तिघे आले—बाळू उत्तम जोशी…शांताराम उत्तम जोशी…आणि अजय त्र्यंबक जोशी. त्यांनी बाक हटवण्यास विरोध केला. काही शब्दांची देवाणघेवाण झाली. मोरे पिता-पुत्रांनी बाकांमुळे होणारा त्रास सांगितला. पण…वाद वाढत गेला. आवाज चढले. शब्द बदलले. आणि काही क्षणांतच परिस्थिती हातघाईवर आली.

“आम्हाला शिवीगाळ करू नका…” असे मोरे पिता-पुत्रांनी तिघा जोशींना सांगितले. पण त्यानंतर बाळू, शांताराम आणि अजय यांनी दोघा पिता पुत्रांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद आता फक्त बाकांचा राहिला नव्हता. तो थेट दोन कुटुंबांच्या संघर्षात बदलला होता.

यश आणि ज्ञानेश्वर यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे. गावातील काही लोक पुढे आले. त्यांनी हस्तक्षेप केला. तिघांच्या तावडीतून मोरे पिता-पुत्राची कशीबशी सुटका झाली. क्षणभर वाटले…आता सगळे शांत होईल. पण नियतीने वेगळाच खेळ मांडला होता. “चला… पोलिसांकडे जाऊया” असा मारहाणीनंतर ज्ञानेश्वर आणि यश या दोघा पिता पुत्रांनी निर्णय घेतला. हात उचलून उत्तर द्यायचे नाही तर कायद्याचा मार्ग स्वीकारायचा असे म्हणत दोघे दुचाकीवर बसले. गंतव्य होते—पहूर पोलिस स्टेशन.

मोरे पिता पुत्र दुचाकीवर…मनात संताप होता. पण त्यापेक्षा मोठी होती न्याय मिळण्याची अपेक्षा. त्यांना काय माहीत…ज्या पोलिस ठाण्यात ते तक्रार देण्यासाठी निघाले होते, तिथपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांच्या आयुष्याला हादरा देणारा प्रसंग वाटेत त्यांची वाट पहात होता.

वाकोद-पहूर रस्ता… आणि मागून आलेली कार …..दुचाकी पुढे जात होती. रस्ता नेहमीसारखाच होता. पण काही अंतर गेल्यानंतर यशच्या लक्षात आले—कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. मागे कार होती. कार जवळ येत होती.

यशने मागे पाहिले…आणि कारमध्ये त्याला परिचित चेहरे दिसले. बाळू जोशी…शांताराम जोशी…अजय जोशी…यश घाबरला. त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. कदाचित त्याच्या मनात एकच विचार आला असेल—“पुन्हा काही वाद नको…” पण पुढच्याच क्षणी…धडाऽऽऽऽम! कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.

क्षणभरात दुचाकीचा ताबा सुटला. पिता-पुत्र रस्त्यावर फेकले गेले. दुचाकी रस्त्यावर घासत गेली. ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. मुलगा यशही जखमी झाला. पण धडक झाल्यानंतरही घटना थांबली नाही, असा आरोप आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला पिता… आणि पुन्हा हल्ला. कार थांबली. त्यातून बाळू, शांताराम आणि अजय असे तिघे खाली उतरले. 

ज्ञानेश्वर मोरे रस्त्याच्या खाली पडले होते. त्यांची अवस्था गंभीर होती. याच अवस्थेत बाळू आणि अजय यांनी ज्ञानेश्वर यांच्या छातीवर, पोटावर आणि तोंडावर लाथा मारल्याचा आरोप आहे. काही क्षणात तिघे कारमध्ये बसले…आणि घटनास्थळावरून निघून गेले.

रस्त्यावर मात्र जखमी पिता-पुत्र जखमी अवस्थेत पडले होते. घटनेची माहिती नातेवाईक भूषण पाटील यांना मिळाली. ते काही गावकऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. ज्ञानेश्वर आणि यश यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. यशवर उपचार सुरू झाले. पण ज्ञानेश्वर मोरे…डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एका मुलासमोर त्याचे वडील कायमचे निघून गेले होते. आणि त्या क्षणी यश स्वतः जखमी अवस्थेत होता. वडिलांना वाचवण्यासाठी तो काही करू शकला नाही. कदाचित त्याच्या डोळ्यांसमोर तोच रस्ता पुन्हा पुन्हा येत असेल…ती कार…ती धडक…आणि रस्त्यावर पडलेले त्याचे वडील…

पण कथा इथे संपली नाही…ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी मांडली गेली. हा अपघात होता, असे सांगण्यात आले. बाळू जोशी स्वतःहून पहूर पोलिस ठाण्यात पोहोचला आणि हा अपघाती मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.

जर ही केवळ अपघाताची घटना असती…तर प्रकरण कदाचित वेगळ्या दिशेने गेले असते. पण एक व्यक्ती होती…जी त्या घटनेची जिवंत साक्षीदार होती. जखमी यश मोरे. जखमी मुलाने पोलिसांना सांगितले… आणि सगळे चित्र बदलले!

जळगाव येथे उपचार घेत असलेल्या यशचा जबाब घेण्यात आला. त्याने पोलिसांना सकाळपासून घडलेला घटनाक्रम सांगितला. बाकावरून झालेला वाद…मारहाण…धमकी…पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी निघालेला पिता-पुत्र…मागून आलेली कार…कारची दुचाकीला झालेली धडक…आणि त्यानंतर वडिलांवर झालेली मारहाण. यशचा जबाब समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

अपघाताची कहाणी संशयाच्या भोवऱ्यात आली. पहूर पोलिस ठाण्यात अखेर गंभीर स्वरूपाचा खूनाचा गुन्हा दाखल झाला. यश मोरे याच्या जबाबावरून बाळू जोशी, शांताराम जोशी आणि अजय जोशी या संशयितांविरुद्ध हा खूनाचा गुन्हा गु.र.नं. 150/2026 भारतीय न्याय संहितेतील कलम 103(2), 109 (2), 351 (2), 352 आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पहूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि काही काळातच तिघांना अटक करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक गणेश सुस्ते, हे.कॉ. उद्दल चव्हाण, सचिन चौधरी, राहुल पाटील, पो.कॉ. संदीप धनगर, जिजाबराव कोकणे, वैभव देशमुख यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

पोलिसांनी तिघांना पकडले… पण मोरे कुटुंबाचा आधार परत आला नाही. अटक झालेल्या तिघांचे छायाचित्र मोरे कुटुंबीयांना दाखवण्यात आले. कुटुंबीयांना एक प्रकारे दिलासा मिळाला. पण तो दिलासा अपुरा होता. कारण…ज्याच्या न्यायासाठी ही सगळी धावपळ सुरू होती, ते ज्ञानेश्वर मोरेच आता या जगात राहिले नव्हते. घरातील कर्ता पुरुष गेला होता. मुलगा जखमी होता. आणि कुटुंबाच्या डोळ्यांत एकच प्रश्न होता—“आता बाबांना न्याय कधी मिळणार?”

ज्ञानेश्वर मोरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातून निघालेली अंत्ययात्रा…शोकाकुल नातेवाईक…आणि एका मुलाच्या आयुष्यात कायमची निर्माण झालेली पोकळी. काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्यांच्या खांद्यावर घराची जबाबदारी होती…आज त्याच खांद्यांना चार माणसांनी उचलून नेले होते. एका छोट्याशा वादाची किंमत एका कुटुंबाने आपल्या माणसाच्या जीवाने चुकवली होती.

न्यायासाठी अखेर समाज रस्त्यावर उतरला. 1 ऑक्टोबर रोजी सकल राजपूत समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराणा प्रताप स्मारकाला अभिवादन करून हा मोर्चा निघाला. खानदेशासह मराठवाड्यातील समाजबांधवही यात सहभागी झाले. मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि कठोर शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.

पण या मोर्चातील सर्वात अस्वस्थ करणारे दृश्य होते…व्हीलचेअरवर बसलेला यश मोरे. शरीरावर जखमा होत्या. पण चेहऱ्यावर वडिलांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार होता. ज्याच्यासोबत काही दिवसांपूर्वी तो दुचाकीवरून पोलिस ठाण्याकडे निघाला होता…आज त्याच वडिलांसाठी तो व्हीलचेअरवरून न्यायाची मागणी करत होता.

एक बाक… तीन वाद… आणि एका घराचा उजाडलेला संसार! ही घटना केवळ एका कुटुंबाची कहाणी नाही. ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. कारण वाद कोणत्याही कारणावरून होऊ शकतो. बाकावरून….रस्त्यावरून…जागेवरून…पाण्यावरून…पैशावरून…पण प्रश्न हा आहे—वाद किती मोठा होता यापेक्षा, आपण तो किती मोठा होऊ दिला?

एका क्षणी शब्द वाढले…शिवीगाळ झाली…हात उचलला गेला…आणि शेवटी वाहनाचा वापर झाल्याचा आरोप आहे. परिणाम? एक जीव गेला. एक मुलगा गंभीर जखमी झाला. एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि अनेकांच्या आयुष्यावर या घटनेची कायमची जखम उमटली.

मतभेद असतील तर बोला. वाद असेल तर कायद्याचा मार्ग घ्या. अन्याय वाटत असेल तर पोलिसांकडे जा. पण…रागाच्या भरात हात उचलण्याआधी एकदा विचार करा—समोरचा माणूस फक्त तुमचा विरोधक नाही, तो कुणाचा तरी वडील आहे, मुलगा आहे, भाऊ आहे… आणि एका कुटुंबाचा आधार आहे. कारण राग काही मिनिटांचा असतो…पण त्यातून झालेली हानी कधी कधी संपूर्ण आयुष्यभराची असते. कुंभारीतील या घटनेचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेतच या प्रकरणातील आरोप आणि पुराव्यांवर अंतिम निर्णय होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment