जळगाव : ट्रॅक्टरला मागून धडक देणा-या चारचाकी वाहनातून गुटखा, पानमसाला वाहतुक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वाहनासह, 5 लाख 90 हजार 440 रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. निंभोरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अटकेतील दोघांविरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु आहे. अजिम तैय्यब सैय्यद आणि शेख मुदस्सीर कासिम (दोघे रा. संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दिनांक 7 ऑक्टोबरच्या सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील वडगाव फाट्यानजीक अपघात झाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी चारचाकी वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली असून रहदारीचा खोळंबा झाला असल्याचे चित्र दिसून आले. अपघात करणा-या चारचाकी वाहनात गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. अधिक तपास सुरु आहे.






