जळगाव : दांडियातील महिलांच्या चेह-यावर मोटार सायकलचा लाईट चमकावण्यासह प्राणघातक हल्ला करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोवीस तासात जेरबंद केले आहे. मयुर चित्राराम जाधव असे अटक करण्यात आलेल्या संशयीत हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील माऊली नगर परिसरात 20 ऑक्टोबरच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दांडीया सुरु असतांना हा प्रकार घडला होता. दांडीया सुरु असतांना मयुर चैत्राराम जाधव हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने त्याठिकाणी आला होता. दांडीया बघण्यास आलेल्या महिलांच्या चेह-यावर त्याने मोटार सायकलचा लाईट चालु बंद केल्याचा आरोप आहे. हा प्रकार संबंधित महिलांना आवडला नाही. त्यामुळे वादाचा प्रकार घडला. या प्रकाराचा जाब विचारणा-या दोघांवर मयुरने धारदार चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात किरण पाटील याचा मृत्यु झाला तर किशोर पाटील हा गंभीर जखमी झाला. जखमी किशोर छगन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 863/2026, भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम 103(1),109(1),351(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करुन आवश्यक माहिती हस्तगत केली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात मयुर चैत्राराम जाधव याचा सहभाग आढळून आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत धनके, ग्रेड पोउनि विजयसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ किरण चौधरी, पो.ना प्रदीप चौधरी, पोकॉ विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, मोतीलाल बोरसे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्ण पाटील करत आहेत.







