जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या गुप्तांगात तिखट लाल मिरची पावडर टाकून तीची हत्या करणा-या पतीस जन्मठेपेसह दहा हजार रुपयांची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजेश जगन पावरा (वय २८, मूळ रा. भोईटी, ता. शिरपूर) असे आरोपी पतीचे नाव आहे. मेहुणबारे पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी या तपासकामी मोलाची भुमिका निभावली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या अथक तपास आणि परिश्रमामुळे हा महत्वाचा न्यायालयीन निकाल समोर आला आहे.

आरोपी हा त्याची पत्नी व दोन मुलांसह तळोदा दिगर (ता.चाळीसगाव) येथे रहात होता. २६ सप्टेबर २०२३ रात्री चारित्र्याच्या संशयावरुन त्याने पत्नीच्या गुप्तांगात लाल मिरची पावडर टाकून खून केला. या प्रकरणी शेतमालकाचा भाचा रामेश्वर रुपचंद राठोड यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
स.पो.नि. संदीप परदेशी यांनी वेळोवेळी साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याचे कामकाज जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांच्या न्यायालयात चालले. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यात फिर्यादी रामेश्वर राठोड, साक्षीदार बदाम चव्हाण, पंच, मयताचे शव विच्छेदन करणारे डॉक्टर आणि तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या.
या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या खटल्यात घटना बघणारे कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होती. मयत व आरोपींची मुले यांनी सरकार पक्षाच्या कथनास समर्थन केलेले नसतांना देखील सहायक सरकारी वकील प्रदीप एम. महाजन यांनी सर्व साक्षीदारांच्या परिस्थितीजन्य पुराव्यांची श्रृंखला जुळवली. युक्तीवादा दरम्यान त्यांनी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपी राजेश जगन पावरा यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी धरले. याप्रकरणी पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी मोलाची मदत केली.






