जळगाव : दहा हजार रुपयांच्या लाचेच्या सापळ्यात जळगाव जिल्हा परिषदेच्या उप विभागीय अभियंत्यासह कनिष्ठ अभियंता असे दोघे जण अडकले असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतिष मनसुलाल शिसोदे (जि.प. उप विभागीय अभियंता) आणि भागवत वसंता चवरे ( कनिष्ठ अभियंता जि.प.) अशी दोघा लाचखोर अभियंत्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील मुळ तक्रारदार हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. मुळ तक्रारदार ठेकेदाराने धरणगाव तालुक्यात रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण केले आहे. या कामाची मोजणी पुस्तिका व बिले तयार करण्यासाठी भागवत चवरे याने अगोदरच विस हजार रुपयांची रक्कम स्विकारली आहे. मात्र ठेकेदाराच्या कामाची बिले मंजुर झाली नाही. त्यामुळे ठेकेदाराने त्याबाबत जिल्हा परिषदेत जावून विचारपुस केली. त्यावेळी चवरे याने संबंधीत कामाच्या बिलांवर सही करुन पुढील मंजुरीसाठी पाठवण्यासाठी शिसोदेसाठी एकुण बिलाच्या दिड टक्के या प्रमाणे पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या बाबत ठेकेदार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुशंगाने पुढील पडताळणीसह कारवाईला वेग देण्यात आला. तडजोडीअंती एक टक्क्याप्रमाणे दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन तीचा स्विकार करण्याचे निश्चीत झाले. पंचासमक्ष दहा हजार रुपयांची लाच चवरे याने स्विकारुन अगोदर स्वत:कडे घेतली. त्यानंतर ती रक्कम शिसोदे याच्याकडे दिली. ती रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिसोदे यांच्या अंगझडतीमध्ये अॅपल कंपनीचा एक मोबाईल फोन व ९१,६२०/- रूपये रोख रक्कम तसेच चवरे याच्या अंगझडतीत विवो कंपनीचा एक मोबाईल फोन व २०,६००/- रूपये रोख रक्कम मिळुन आली.






