जळगाव – पारोळा रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या चेन चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून 6 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद केले आहे. सालाबाद प्रमाणे पारोळा येथे होणाऱ्या रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेत 22 ऑक्टोबर रोजी तीन ते चार अज्ञात इसमांनी गर्दीतील लोकांच्या अंगावरील दागिने जबरीने चोरुन नेण्याचा प्रकार केला होता. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात सुरु होता. तपास पथकाला प्राप्त गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील चोरटा हा बीड शहरातील असून त्याचे नाव गणेश कचरू पवार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी संदर्भात तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक बीड शहरात सलग आठ दिवस ठाण मांडून होते.
अथक प्रयत्नानंतर आरोपी चोरटा गणेश कचरू पवार यास ताब्यात घेण्यात आले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने दोन पंच व सोनार यांच्या समक्ष जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ हितेश चिंचोरे (नेमणूक पारोळा पोलीस स्टेशन) हे करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, पोकॉ राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदिप सपकाळे, मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच चालक पोकॉ रिजवान शेख यांच्या पथकाने या तपास कामी सहभाग घेतला.






