जळगाव : वरणगाव पोलिस स्टेशनला दाखल गोळीबारीच्या घटनेतील जखमी तरुणाचा वैद्यकीय उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढले आहे. वरणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील फुलगाव उड्डान पुलाखाली 1 नोव्हेंबरच्या रात्री बदल्याच्या भावनेतून ही घटना घडली होती. दरम्यान दोघा संशयीतांना 13 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भुषण ऊर्फ बिस्ला राजू सावळे आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे अशी दोघा संशयीत आरोपींची नावे असून सरफराज सय्यद बशीर सय्यद असे मयताचे नाव आहे.
या घटनेत मयत सरफराज याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. त्याचवेळी गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात एक गोळी सरफराज यांच्या खांद्याला लागली होती. सरफराज यास जखमी अवस्थेत सोडून दोघे हल्लेखोर मोटार सायकलने घटनास्थळवरुन पसार झाले होते. वैद्यकीय उपचारा दरम्यान जखमी सरफराज याचा 8 नोव्हेंबर रोजी मृत्यु झाला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करत आहेत.





