पिस्तुलचा धाक दाखवत मारहाण करणा-या अधिका-याविरुद्ध कारवाईची मागणी

On: November 12, 2026 4:44 PM

जळगाव : पिस्तुलचा धाक दाखवत रिक्षा चालकास मारहाण करणा-या प्रशासकीय अधिका-याविरुद्ध कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शासनास केली आहे. नगरपालिका प्रशासन सह आयुक्त जनार्दन पवार असे संबंधीत अधिका-याचे नाव आहे. पदाचा गैर वापर करुन एका रिक्षा चालकास मारहाण करणा-या या अधिका-याने बेकायदेशीररित्या खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” पाटी लावून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. MH 19 DS 9889 क्रमांकाच्या या खासगी वाहनावर सोळा हजार रुपयांचा इ चालान दंड देखील थकीत असल्याचे म्हटले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि जबाबदार अधिका-यास वेगळा न्याय राजरोसपणे केला जात असल्याची ओरड या निमीत्ताने सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.

दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री अंदाजे 7.55 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील टीव्हीएस शो रुम नजीक एक सामान्य रिक्षा चालक प्रवाशांची वाट बघत त्याच्या ताब्यातील रिक्षासह उभा होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या MH 19 DS 9889 या क्रमांकाच्या कारची धडक भोपळे यांच्या रिक्षाला लागली. या धडकेबाबत रिक्षा चालक भोपळे यांनी कार चालक तथा प्रशासकीय अधिकारी जनार्दन पवार यांना विचारणा केली. कारच्या धडकेचे कारण विचारल्याचा राग आल्याने जनार्दन पवार यांनी रिक्षा चालकाच्या पोटाला शस्त्र लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

पिडीत रिक्षाचालकाने या घटनेबाबत 7 नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र समोरची व्यक्ती उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळे या प्रकरणाचा अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप होत आहे. या गुन्ह्यात वापरलेली कार (MH 19 DS 9889) ही उच्च पदस्थ अधिकारी जनार्दन पवार यांच्या नावावर खाजगी वाहन म्हणून नोंदणीकृत असल्याचे म्हटले जाते. या खासगी वाहनावर बेकायदेशीररीत्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावण्याचा गंभीर गुन्हा असून हा पदाचा गैरवापर असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

RTI Dipakkumar gupta

या संबंधीत वाहनाची गोपनीय सुत्रांकडून दीपककुमार गुप्ता यांनी माहिती घेतली असता या वाहनावर यापूर्वीच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे आठ ई-चालान (E-Challans) प्रलंबित असून, त्यावर तब्बल सोळा हजार रुपये दंड थकीत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी स्वतः कायद्याचे रक्षक असताना अशा प्रकारे वारंवार कायदे मोडत असल्याची ही लाजीरवाणी बाब असल्याचे देखील म्हटले जात आहे.

एका सामान्य नागरिकाला शस्त्र दाखवून मारहाण केल्याप्रकरणी आणि स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याची दखल घेऊन, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 च्या कलम 173(4) अन्वये तात्काळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश व्हावेत अशी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. संबंधीत अधिकाऱ्याचा शस्त्र परवाना (Arms License) तात्काळ रद्द करण्यात यावा. खाजगी वाहनावर (MH 19 DS 9889) बेकायदेशीररीत्या ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावल्याबद्दल आणि प्रलंबित सोळा हजार रुपयांच्या दंडाची वसुली करून मोटार वाहन कायद्यान्वये कठोर दंडात्मक कारवाई करावी. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग केल्याप्रकरणी जनार्दन पवार यांची तात्काळ विभागीय चौकशी (Departmental Inquiry) सुरू करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशा विविध मागण्या देखील गुप्ता यांनी केल्या आहेत. या तक्रारीच्या प्रती त्यांनी राज्याचे मुख्य सचिव, विभागीय महसुल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना पाठवल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment