साडे सात लाखांची संशयास्पद रोकड दोघांकडून हस्तगत

On: November 18, 2026 2:14 PM

जळगाव : साडे सात लाख रुपयांच्या संशयास्पद रकमेसह एकुण 10 लाख 95 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जळगाव शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या पथकाने जप्त केला आहे. काही इसम सोन्याचे बिस्कीट घेऊन त्याचे पार्सल करण्याच्या संदर्भात संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीची खात्री करुन रितसर कारवाई करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल इमरान बेग व मंगल साळुंखे यांना रवाना करण्यात आले होते.  

दिनांक 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ममुराबाद रस्त्यावर दोन बुलेटस्वार तरुण संशयास्पदरित्या वाहतुक शाखेच्या पथकाला आढळून आले. त्यांच्या कब्जातील बॅगेची झडती घेतली असता त्यात साडे सात लाख रुपयांच्या संशयास्पद चलनी नोटा आढळून आल्या. चौकशी दरम्यान दोघे तरुण या रकमेबाबत योग्य ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही. त्यामुळे पोलिस उप निरीक्षक रहीम रज्जाक शेख यांच्याकडुन या रकमेसह त्यांच्या कब्जातील मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला.

हरिष राजेंद्र महाजन आणि सुजित गोकुळ महाजन (दोघे रा. अडावद ता. चोपडा) या दोघा तरुणांविरुद्ध  जळगाव तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कब्जातून साडे सात लाख रुपयांच्या चलनी नोटा, बुलेट मोटार सायकल, आयफोन, मोबाईल व खिशातील नोटा असा एकुण 10 लाख 95 हजार 120 रुपये रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जळगांव शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या पथकातील पो.कॉ. इम्रान रहिम बेग व पो.कॉ. मंगल नथ्थु साळुंखे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment