जळगाव : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. सदर अटकेतील आरोपी गेल्या अकरा महिन्यापासून फरार होता.
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला 21 डिसेंबर 2019 रोजी भाग 5 गु.र.नं. 0579/2019 भा.द.वि. 394, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी सागर सुभाष बारगळ (रा.मुंडवाडी ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद) हे आपल्या गावी जाण्यासाठी 21 डिसेंबर 2019 रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीच्या दिशेने पायी जात होते.
त्यावेळी तिघा अज्ञात इसमांनी त्यांच्या ताब्यातील सहा हजार रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल तसेच 1700 रुपये रोख असे मारहाण करत चाकूच्य धाकावर बळजबरी हिसकावून नेले होते.
या गुन्ह्यातील 11 महिन्या पासून फरार आरोपी लुकमान उर्फ लुक्का कादर शहा (26) दीनदयाल नगर, भुसावळ हा भुसावळ शहरात आला असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या डीबी पथकातील कर्मचारी वर्गाला योग्य त्या सुचना देत त्याला ताब्यात घेण्याकामी तयारीनिशी रवाना केले.
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमिअर समोर सापळा रचुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना.किशोर महाजन, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे यांच्या पथकाने सदर कारवाई केली.