पुणे : गोपनीय अहवाल अनेक व्हाटस अॅप गृपवर प्रसारीत झाल्याप्रकरणी सहायक पोलिस निरिक्षकासह सहायक फौजदारास पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबित केले आहे. शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.
स.पो.नि. निलेश घोरपडे व एएसआय राजेश कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ससून रुग्णालयात शैलेश जगताप हे उपोषण करत होते. उपोषणार्थींचे समुपदेशन करण्याकामी जाण्यास स.पो.नि. निलेश घोरपडे यांना वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते. मात्र याप्रकरणी सविस्तर अहवाल वरिष्ठ निरीक्षकांच्या निदर्शनास त्यांनी आणला नाही. तसेच अनावश्यकरित्या स्टेशन डायरीला नोंद करण्याकामी रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट गोपनीय कामकाज हाताळणारे एएसआय राजेश कांबळे यांना त्यांच्य मोबाईलवर व्हाटस अॅप माध्यमाद्वारे पाठवला. हा रिपोर्ट नंतर अनेक व्हाटसअॅप गृपवर व्हायरल झाला. त्यामुळे शासकीय गोपनीयतेचा भंग झाला. याप्रकरणी संबंधीत दोघांना अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबित केले आहे.
निलेश घोरपडे व राजेश कांबळे हे बंडगार्डन पोलीस स्टेशनला नेमणूकीस आहेत. 11 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ससून रुग्णालयातील न्यायालयीन बंदी असलेले शैलेश जगताप हे उपोषणाला बसले होते. त्याठिकाणी जावून त्यांचे समुपदेशन तसेच शांतता प्रस्थापीत करण्याकामी जाण्यास घोरपडे यांना कळवण्यात आले होते.
स.पो.नि.घोरपडे यांनी सहायक फौजदार राजेश कांबळे, महिला पोलीस कर्मचारी बोऱ्हाडे यांच्यासह घटनास्थळी जावून उपोषणार्थी शैलेश जगताप यांची चौकशी केली़.
शैलेश जगताप यांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. उपोषणार्थी शैलेश जगताप यांनी आपण उपोषणास का बसलो आहोत याची कारणमिमांसा त्यावेळी सुरु केली. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल असून दाखल असलेल्या गुन्ह्याचे फिर्यादी, गुन्ह्याचे अंमलदार, सरकारी वकील यांची स्पेशल चौकशी समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच रास्ता पेठ येथील जागेचा ताबा घेण्यासाठी मोक्क्याचे गुन्हे दाखल करुन दबाव टाकत असल्याच्या कारणामुळे आपण उपोषण करत असल्याचे म्हटले.
या घटनेची माहिती स.पो.नि.घोरपडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणली नाही. उलट अनावश्यकरित्या स्टेशन डायरीला नोंद करण्यासाठी रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट नियंत्रण कक्षातील स्टेशन डायरीत नोंद होण्याकामी तेथील हवालदारांच्या मोबाईलवर विनाकारण पाठविला. हा स्टेशन डायरी रिपोर्ट सहायक फौजदार राजेश कांबळे यांच्या मोबाईलवर व्हाटसअॅपच्या माध्यमातून पाठविला.
सदर रिपोर्ट व्हायरल झाल्यामुळे त्याचा परिणाम शैलेश जगताप यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार, फिर्यादी व या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज पाहणारे सरकारी वकीलांसह इतरांच्या भूमिकेबाबत संदेह निर्माण झाला.
पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणे तसेच आरोपीना मदत करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे स्पष्ट होणे या व अशा बेजबाबदार गैरकृत्याप्रकरणी दोघांच्या निलंबनाचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दिला.







