नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयात फसवणूक झाली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागपूर (सीताबर्डी) पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भात प्रकरण दाखल करत संबंधिताला अटक केली आहे. तापस घोष असे अटकेतील संशयितांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोबडे परिवाराची नागपूरच्या आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपती आहे. त्यावर सीझन लॉन तयार करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी तापस घोष याला हे लॉन चालविण्यास देण्यात आले होते. या लाँन पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशेब तापस घोष व त्याची पत्नी ठेवत होते.
या लॉनचा मालकी हक्क शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्या नावाने आहे. त्या बऱ्याच वयोवृद्ध आहेत. घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या या परिस्थितीचा फायदा घेत लॉनच्या भाड्यापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यांनी बनावट पावत्या तयार करून रक्कम हडपली असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी हा प्रकार बोबडे परिवाराच्या लक्षात आला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बाबत तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून घोष दाम्पत्याची चौकशी करण्यात आली असता कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार झाला असल्याची बाब पुढे आली असल्याचे समजते. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपी घोष यास अटक केली.






