मुंबई : कोरोनाची लाट आता जवळपास ओसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने क्रीडापटूंसाठी चांगला निर्णय घेतला आहे. सरकारने विविध खेळाच्या प्रशिक्षणासाठी आता परवानगी दिली आहे. तसेच स्पर्धा देखील आयोजित करण्यास होकार दिला आहे.
आर्चरी, सायकलिंग, तलवारबाजी, शुटिंग याशिवाय क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल या खेळांना सराव करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील विविध मैदाने तसेच प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहेत. सर्व प्रशिक्षणाच्या ठिकाणी 10 ते 15 खेळाडू नेमून दिलेल्या वेळेत व सुरक्षीत अंतरात सराव करतील.
खेळाडू तसेच त्यांचे पालक यांच्यात जर कोविडची लक्षणे आढळली तर त्यांना सरावाच्या ठिकाणी जाण्यास मनाई राहील. त्यासोबतच कंटेनमेंट झोनमध्ये देखील परवानगी नाकारली जाईल. प्रशिक्षण अथवा स्पर्धेत कोविड चाचण्या घेतल्या जातील.








