मुंबई : कोरोना लसीकरण करण्यासाठी सरकारने मायक्रो प्लॅनिंग सुरु केले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्या नागरिकाला मेसेज येईल त्याला कोरोना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे.
कोरोना लस देण्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला मोबाईलवर मेसेज येईल. तो सेंटरवर येणार असल्याची व आल्याची ओळख पटल्यानंतर त्याला लस दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कोरोना लस केंद्र सरकार पुरवेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसीबाबत केंद्राकडे परवानगीची मागणी केली आहे. त्यावर केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबर महिना अखेर केंद्राने परवानगी दिल्यास जानेवारीपासून लसीकरण केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकार माहिती मागवत असून त्याकामी डेटा तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी 18 हजार लोकांना ट्रेनिंग देण्याचे काम पुर्ण होणार आहे.








