चोरीची दुचाकी पळवतांना झाली स्लीप! जखमी चोरट्यास बसली पोलिसांची ग्रीप!!

On: February 16, 2021 5:49 PM

जळगाव : चोरीची दुचाकी पळवून नेतांना वाटेत स्लीप झाल्याने चोरटा जबर जखमी झाला. चोरट्याचा माग काढत पोलिस पथक त्याच्या घरी गेले असता तो जखमी अवस्थेत आढळून आला. विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरल्यापासून पळवून नेतांना स्लीप झाल्याचा सर्व घटनाक्रम कथन केला. प्रसाद जयराम पाटील असे दुचाकी चोराचे नाव असून तो सध्या एमआयडीसी पोलिसांच्या अटकेत आहे. चोरीची दुचाकी स्लीप झाल्यामुळे त्याला एक प्रकारे प्रसाद मिळाल्याचे म्हटले जात आहे.

भिमराव सुकलाल बारी हा तरुण 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधे जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या ताब्यातील दुचाकीची चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी त्याने रितसर गुन्हा दाखल केला होता. या दुचाकी चोरीचा तपास करत असतांना वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, चेतन सोनवणे, सचिन मुंडे, सचिन पाटील यांनी माग काढत त्याचे घर गाठले. दुचाकी चोर प्रसाद जयराम पाटील हा त्याच्या घरी जखमी अवस्थेत पोलिस पथकाला आढळून आला. त्याच्या डोळ्याला, डोक्याला व हाताला मार बसला होता. त्याने दवाखान्यात जावून वैद्यकीय उपचार पुर्ण केला होता. त्याबाबत वरिष्ठ अधिका-यांना माहिती मिळाली होती. त्याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment