जळगाव : “बीवी रहे टीप टॉप, दो के बाद फुल स्टॉप” या ब्रिदवाक्याप्रमाणे सायली व तिच्या पतीचा संसार सुरु होता. माहेर आणि सासर जळगाव असलेल्या सायलीच्या संसारवेलीवर दोन पुत्ररत्नांचे आगमन झाले होते. एकंदरीत तिचा चौकोनी संसार मजेत सुरु होता. स्वर्गातील अप्सरा आणि बॉलीवुड मधील तारकेसमान सायलीची सावली देखील ती तरुण आणि देखणी असल्याची साक्ष देत असे. तिचे रुप आणि शरीराचे आकारमान चारचौघात खुलून दिसणारे होते.
यशस्वी महिला उद्योजक होण्याचे खुळ तिच्या मनात एके दिवशी आले. मनातील ते खुळ पुर्ण करण्यासाठी ती कामाला लागली. पंतप्रधान रोजगार योजनेच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांना बॅंकेकडून कर्ज मिळत असल्याचे तिला कुणीतरी सांगीतले. या माहीतीच्या आधारे तिने बॅंकेत जाण्याचा निश्चय केला. शहरातील शिव कॉलनी परिसरात तिची एक मैत्रीण रहात होती. त्या मैत्रीणीला सोबत घेत तिने शिव कॉलनी लगत असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेत जाण्याचे नियोजन केले.
आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पहिल्याच भेटीत आणि पहिल्याच नजरेत बॅंक मॅनेजरवर पडली पाहीजे असे तिने मनाशी ठरवले होते. मैत्रीणी सोबत बॅंक मॅनेजरची भेट घेण्यासाठी तिने तयारी केली. आकर्षक पेहराव आणि त्यावर सुगंधी परफ्युमचा भपका सोडत तिने मैत्रीणीसोबत बॅंक गाठली. बॅंक व्यवस्थापकाची स्वतंत्र कॅबीन असलेल्या दरवाज्यावर “अशोकनाथ शर्मा” असे ठळक अक्षरात लिहीले होते. दरवाजा हळूच ढकलत “सर आत येवू शकते का?” असे तिने शाखा व्यवस्थापक अशोकनाथ शर्मा यास अदबीने सुमधूर आवाजात विचारणा केली. सुमधुर आणि मंजुळ आवाज कानावर पडताच अशोकनाथ शर्मा याने मान वर करुन पाहिले असता दरवाजात एक लावण्यवती उभी होती. मनमोहक ललनेचे रुप बघून मनाने घायाळ झालेल्या अशोकनाथ शर्मा याने सायली व तिच्या मैत्रीणीला आत बोलावून बसण्यास सांगीतले.
कॅबीनमधील एसीच्या थंड हवेने सायलीच्या चेह-यावर स्मित हास्य खुलण्यास वेळ लागला नाही. तिने आपला परिचय देत येण्याचे प्रयोजन व्यवस्थापक शर्मा यास सांगितले. कर्ज प्रकरणाशी संबंधीत चर्चा केल्यानंतर बॅंक व्यवस्थापक अशोकनाथ शर्माने सायलीचा मोबाईल क्रमांक आठवणीने घेतला. काहीवेळ चर्चा केल्यानंतर सायली घरी निघून आली.
त्या दिवशी अशोकनाथ शर्मा यास लवकर झोपच लागली नाही. त्याच्या नजरेसमोरुन सायलीचा मनमोहक चेहरा जाण्याचे नावच घेत नव्हता. सायली त्याच्या मनात भरली होती. वास्तविक बॅंक व्यवस्थापक पदावर असलेला अशोकनाथ शर्मा हा एक विवाहित होता. सायली देखील एक विवाहीत होती. तरीदेखील “सुंदरा मनात भरली” अशी त्याची गत झाली होती. रात्री केव्हातरी त्याला झोप लागली. मात्र झोपेत स्वप्नात देखील त्याला सायलीचा हसरा चेहरा दिसत होता. अशा प्रकारे सायलीच्या पहिल्याच नजरेत शर्मा घायाळ झाला होता.
तो अधुनमधून तिच्या मोबाईल क्रमांकावर तिला संदेश देवू लागला. त्याने तिला पंधरा दिवसांनी बॅंकेत येवून भेटण्यास बोलावले. मात्र कामाच्या ओघात सायली बॅंकेत जावू शकली नाही. त्यामुळे त्याने तिला म्हटले की सुटीच्या दिवशी बॅंकेत गर्दी नसते. सुटीच्या दिवशी व्यवस्थीत चर्चा करता येईल.
त्याने तिचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे ती देखील सुटीच्या दिवशी शर्मा यास भेटण्यासाठी बॅंकेत गेली. सुटीचा दिवस असल्यामुळे बॅंकेत ग्राहकांचा येण्याचा प्रश्नच नव्हता. शर्मा त्यावेळी बॅंकेत एकटाच होता. यावेळी देखील सायलीने आकर्षक आणि टिपटॉप पेहराव केला होता. तिचा आकर्षक पेहराव बघून शर्माचे काळीज जणू काही चिरले गेले. सायली खुर्चीवर बसताच त्याने तिला पिण्यासाठी शितपेय दिले. तिने नको म्हटले तरी तिला आग्रह करत त्याने ते शितपेय तिला पिण्यास भाग पाडले. शितपेय प्राशन केल्यानंतर सायलीला काही प्रमाणात गुंगी येण्यास सुरुवात झाली. तिला समोरचे अस्पष्ट दिसू लागले. तिच्या गुंगीचा फायदा घेत अशोकनाथ शर्मा याने तिच्यावर अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. आपल्यासोबत काहीतरी चुकीचे होत असल्याचा भास सायलीला होत असला तरी तिची प्रतीकार क्षमता पुरेसी नसल्यामुळे ती हतबल झाली होती. बॅंकेत तिसरा कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अशोकनाथ शर्मा याने तिच्या संमतीविना तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्यासोबत विक्षीप्त फोटो काढले व अश्लील व्हिडीओ क्लिप देखील तयार केली.
काही वेळाने सायलीला ब-यापैकी शुद्ध आली. आपल्यासोबत काय घडले याची तिला चांगल्याप्रकारे जाणीव झाली होती. शितपेयात काय होते याची तिने विचारणा केली असता शर्माने तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आता मी पोलिस स्टेशनलाच तक्रार करते अशी तिने त्याला धमकी दिली. त्यावर त्याने तिला उलटटपाली धमकी दिली की तुझे विवस्त्र अवस्थेतील फोटो व क्लिप माझ्याकडे आहे. ते फोटो व क्लिप मी व्हायरल केल्यास तुझी बदनामी होईल. तरी देखील तु पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देखील त्याने तिला दिली. त्याच्या अशा बोलण्यामुळे काय करावे हे तिला सुचेनासे झाले. हा प्रकार आपल्या पतीला समजला तर घरात वाद होतील याची देखील तिला भिती वाटत होती.
काही दिवसांनी अशोकनाथ शर्मा याने सायलीस लोनसंदर्भातील कागदपत्रे घेवून येण्यासाठी फोन केला. त्यावर तिने नकार दिला. नकार दिल्यानंतर देखील शर्मा याने तिला फोन व मेसेजेस करण्याचे काम सुरुच ठेवले. तु मला भेटली नाही तर मी तुझे फोटो व क्लिप व्हायरल करेन अशी धमकी त्याने तिला देण्यास सुरुवात केली. मी नाशिक येथे बहिणीच्या घरी असल्याचे खोटे सांगून तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिला नाशिक येथे येवून फोटो व क्लिप देण्याची व भेटण्याची तयारी दर्शवली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिने नाशिकला जाण्याची तयारी केली.
नाशिक रेल्वे स्टेशनवर गर्दी असल्याचे निमीत्त करत तो तिला जवळच्या एका लॉजवर घेवून गेला. त्या रात्री त्याने पुन्हा तिच्यासोबत समागम करत शरीरसंबंध प्रस्थापीत केले. यावेळी देखील भितीपोटी तिने हा प्रकार कुणाला सांगीतला नाही. माझा पत्नीसोबत घटस्फोट झाला असून मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे असे म्हणत त्याने त्या रात्री तिच्यासमवेत शरीरसंबंध केले. मला तु खुप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करेन. मी तुला काही कमी पडू देणार नाही असे म्हणत त्याने वेळोवेळी तिच्यासोबत शरीरसंबंध सुरुच ठेवले.
तु तुझ्या पतीपासून घटस्फोट घे, मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे असे तो तिला सांगू लागला. त्याच्या बोलण्याला ती बळी पडली. आता ती बॅंक मॅनेजर अशोकनाथ शर्मा यास जेवणाचा डबा देण्यासाठी बॅंकेत जावू लागली. तो सांगेल तसे ती वागू लागली. त्याने तिला महाराणीसारखे ठेवण्यास सुरुवात केली. त्याने तिला मुंबई येथे भाड्याचे घर घेवून दिले. ती जळगाव सोडून मुंबई येथे राहू लागली. शनीवार आणि रविवार तसेच इतर सुटीच्या दिवशी अशोकनाथ तिला भेटण्यासाठी मुंबईला जावू लागला. मुंबईला गेल्यावर तो तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवू लागला.
या सर्व गोष्टीची कुणकुण सायलीच्या पतीला लागली. आपली पत्नी आपल्याला सोडून वारंवार कुठे जाते व काय करते हे तिच्या पतीला समजू लागले होते. त्यामुळे भरल्या संसारात वाद सुरु झाले होते. दोन मुलांची आई असलेली सायली बॅंक मॅनेजरसोबत लग्न करण्याच्या आमिषाला बळी पडली होती. तिने पतीपासून विभक्त होण्याचे ठरवले. अखेर ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. आजवरचा तिचा पतीसोबत सुरु असलेला संसार एका बॅंक मॅनेजरमुळे तुटला होता.
बॅंक मॅनेजर अशोकनाथ याचा त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला नसल्याचे तिला उशीरा समजले. दरम्यान तिने तिच्या पतीला घटस्फोट दिलेला होता. तिचा चालताबोलता संसार शर्मामुळे तुटला होता. तुझ्यामुळे माझा भरला संसार तुटला असून तु माझी फसवणूक केली असल्याचे तिने शर्मा यास म्हटले. त्यावर व्हाटस अॅपच्या माध्यमातून त्याने तिच्या समाजाविषयी खालच्या थराचा उल्लेख केला.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठले. पो.नि. विलास शेंडे यांची भेट घेत तिने सर्व हकीकत त्यांचेकडे कथन केली. पो.नि. विलास शेंडे यांनी तिची फिर्याद घेण्याची ठाणे अंमलदारास सुचना केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत बॅंक मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 54/21 भा.द.वि.376, 504, 507, तसेच अनुसुचीत जाती जमाती कायदा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांनी आपल्याकडे घेतला. स्टेट बॅंक ऑफ इंडीया शिवकॉलनी शाखेचा व्यवस्थापक अशोकनाथ सिताराम शर्मा यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक सुनील पाटील, पोलिस नाईक निलेश पाटील पुढील तपास करत आहेत. (या कथेतील पिडीत महिलेचे “सायली” हे नाव काल्पनिक आहे)










