बनावट नोटा पकडून देतो म्हणत पोलिसांना चकवा देणा-या खब-यास अटक

On: February 23, 2021 8:56 PM

शिरुर : शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देण्याचे सांगत थेट पोलिसांचीच फसवणूक करत चकवा देणा-या नकली खब-याला पोलिसांनी अटक केली आहे. कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देण्याकामी या खब-याने एक लाख रुपयांची रक्कम टीप म्हणून मागीतली होती. मात्र फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर एकाला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. या घटनेतील चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

रांजणगाव परिसरात तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा असलेले गोडावून पकडून देतो असे गुप्त बातमीदाराने दहशतवाद विरोधी पथकाचे स.पो.नि. अर्जुन मोहिते यांना सांगितले होते. मात्र या कामाचे एक लाख रुपये द्यावे लागतील अशी अट त्याने घातली होती. बनावट नोटांचे गोडावुन दाखवण्याकामी खब-याला सिक्रेट फंडातून एक लाख रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली.

गोडाऊन दाखविण्याकामी खोट्या खब-याच्या मागेमागे पोलिस पथक निघाले. खोट्या खब-याने पोलिस पथकाला मुंबईहुन जुन्या महामार्गाने लोणावळा, तळेगाव दाभाडे, चाकण व तेथून शिक्रापुर मार्गे पुन्हा रांजणगावकडे आणले. गाव जवळ येताच त्याने त्याच्या ताब्यातील वाहनाचा वेग वाढवला. त्याच्या हालचालींवर पोलिस पथकाला संशय आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस पथकाने त्याचा पाठलाग केला. त्याला देण्यात आलेली एक लाख रुपयांची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली.

या घटनेप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनला चौघांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर तिघे आरोपी फरार झाले असून एकाला न्हावरा फाटा(ता. शिरूर) येथून अटक करण्यात आली. सिकंदर परमेश्वर राम (32) आंबेडकर नगर वरळी – मुंबई असे अटकेतील आरोपीचे नाव असून कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के.पी. सिंग (गुजरात) अशी इतरांची नावे आहेत. अटकेतील सिकंदर राम यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पो.नि. प्रविण खानापुरे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment