औरंगाबाद : क्षणभराचा राग आपले आयुष्य उध्वस्त करु शकतो. क्षणभराचा विचार आपले आयुष्य बदलू शकतो. त्या निर्णायक क्षणी बळकट सेतूच्या रुपात कुणी मदतीला धावून आला तर तो देवदूत ठरतो. औरंगाबाद येथे अशाच एका निर्णायक क्षणी पोलिस पथक बळकट सेतूच्या रुपात धावून आल्याने आत्महत्या करणा-या महिलेचे प्राण वाचले आहे. पती पत्नीचा वाद आणि राग हा संसाराचा एक अविभाज्य घटक असतो. मात्र त्या रागाच्या आणि वादाच्या भरात कधी कधी दोघांपैकी कुणीतरी टोकाचे पाऊल उचलत असतो. टोकाचे पाऊल उचलत असतांना त्या निर्णायक क्षणी कुणीतरी सुदैवाने मदतीला धावून येतो.
औरंगाबाद येथील पोलिस उप निरिक्षक अमोल देवकर, गजानन सोनटक्के, हवालदार मंगेश पवार, नरेंद्र गुजर अशांचे पथक कोरोनाची लस घेण्यासाठी सेव्हन हिल उड्डानपुलावरुन मार्गक्रमन करत होते. त्यावेळी या पथकाची नजर पुलाच्या ग्रीलवर चढलेल्या एका महिलेवर गेली. ती महिला काही क्षणात उडी मारुन जीव देण्याच्या तयारीत होती. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी धावत जावून त्या महिलेला पकडत तिला बाजुला घेतले. क्षणाचाही विलंब झाला असता तर ती महिला प्राणाला मुकली असती आणि पोलिस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद झाली असती. पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढत जीव देण्याचे कारण विचारले. त्यावेळी तिने पती पत्नीमधील वाद हे कारण कथन केले. या वादाच्या आणि रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. पोलिसांनी तिचे समुपदेशन करत तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करत घरी रवाना केले. आता असे कृत्य भविष्यात करणार नाही असे तिच्यकडून त्यांनी आश्वासन घेतले. त्यानंतर पोलिस पथक कोरोनाची लस घेण्यासाठी पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.








