जळगाव – शेअर मार्केटमधे पैसे गुंतवून कर्जबाजारी होण्यासह ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्याच नातेवाईकाला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी यापुर्वी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याच्या तपासात ही माहिती पुढे आली असून ड्रग्ज खरेदीदार आणी विक्रेता अशा दोघांची नावे देखील समोर आली आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव कॉलनी परिसरात 29 जुलै 2026 रोजी एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली होती. कल्पेश सतीश रायसिंग (वय 26, रा. वाळकी ता. चोपडा, जि. जळगाव) या तरुणाला त्याच्या दुचाकीच्या सिटखाली असलेल्या एमडी ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सखोल तपास, सखोल चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कल्पेश रायसिंग याचा नातेवाईक जतीन रविंद्र सेंदाणे (वय 36, रा. नांदेड, ता. धरणगाव) याची भूमिका उघड झाली. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसान आणि एमडीचे व्यसन यामुळे त्याने अमली पदार्थांच्या व्यवहारात प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी पुढील तपासात चेतन दत्तात्रय वानखेडे उर्फ चंदू सोनार (वय 42, रा. सराफ बाजार, राममंदिर वॉर्ड, भुसावळ) यालाही अटक केली. त्याने कल्पेश रायसिंग याला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पुरवठा केल्याचे तसेच संपूर्ण व्यवहाराचे नियोजन केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात जतिन सैंदाणे यानेच कल्पेशच्या दुचाकीच्या सिटखाली एमडी ड्रग्ज लपवून ठेवत पोलिसांना खोटी माहिती दिली. पोलिस आपल्या सांगण्यावरुन या प्रकरणी कल्पेशच्या वडीलांकडून तोडीपाणी करतील आणि त्यातील अर्धा हिस्सा आपल्याला मिळेल अशी जतीन यास अपेक्षा होती. मात्र कारवाई झाली आणि जतीनचे फासे उलटे पडले. या प्रकरणी सुरुवातीला रामनंद नगर पोलिस स्टेशनला कल्पेश याच्याविरुद्ध रितसर गुन्हा नोंद झाला.
अटक करण्यात आलेल्या जतीन सेंदाणे आणि चेतन वानखेडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 5 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, डिवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मधुकर साळवे आणि तपास पथकाने या घटनेचा अधिक तपास केला. पुढील तपास सुरू आहे.





