मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर जिलेटीन कांड्यांनी भरलेले वाहन सापडल्याप्रकरणी सुरु असलेल्या एनआयएच्या तपासात विविध नवनवीन बाबी पुढे येत आहेत. निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे हॉटेल ट्रायडंट हॉटेलमधे मुक्कामी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपास पथकाला आढळून आले आहेत. हॉटेल ट्रायडंट येथील वास्तव्यात सचिन वाझे यांच्यासमवेत एक महिला व तिच्या हातात चलनी नोटा मोजण्याचे मशीन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही महिला कोण होती? हा नविन प्रश्न पुढे आला आहे.
हॉटेल ट्रायडंट येथे 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत सचिन वाझे वास्तव्याला होते. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले होते. हा कट हॉटेल ट्रायडंट येथील मुक्कामात तयार करण्यात आला होता का? याचा तपास एनआयए कडून सुरु आहे. बोगस आधार कार्डचा वापर करुन सचिन वाझे यांनी हॉटेलात मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे पाच बॅगा होत्या. त्यातील एका बॅगेत जिलेटीन भरलेली बॅग असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या कटात ती महिला होती काय? ती महिला कोण होती? तिच्या ताब्यात पैसे मोजण्याचे यंत्र होते. या सर्व बाबी तपासात घेतल्या जात आहेत.
झाडाझडती दरम्यान वाझेंकडे मिळून आलेल्या डायरीत माहितीचा स्त्रोत मिळाला असल्याचे देखील समजते. वसुलीसाठी कधी कुणाला भेटायचे? किती पैसे वसुल करायचे? याशिवाय पब्ज, बार व हुक्का पॉर्लरची यादी सांकेतीक भाषेत असल्याचे म्हटले जात आहे.