जळगाव मनपा सत्तांतर नाट्य – गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचा परिपाक

जळगाव शहरात भाजपकडे असलेली महानगरपालिका भाजपच्या सत्तावीस नगरसेवकांच्या बंडखोरी आणि घोडेबाजारानंतर शिवसेना नेतृत्वाकडे गेली आहे. जळगाव मनपाची सुत्रे नुकतीच ताब्यात घेतलेल्या महापौर सौ. जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेत्याची सूत्रे घेणारे त्यांचे पती महोदय सुनील महाजन या दाम्पत्याचे सर्वप्रथम अभिनंदन.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे  आता त्यांनी जळगाव शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी  योजना- हरित- स्वच्छ जळगावच्या विकासाला गती द्यावी अशी जळगावकरांची अपेक्षा दिसते. तरीही 75 सदस्यीय मनपात भाजपचे 57 नगरसेवक असताना केवळ 15 सदस्यीय शिवसेना संख्याबळावर सत्ता परिवर्तनाचा पराक्रम कसा करु शकते? या छोट्याशा धक्कादायक प्रश्नात जळगाव जिल्हा भाजपचे नेतृत्व करणारे माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांची एकाधिकारशाही कार्यपद्धती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचा धडाका यामुळे भाजप नगरसेवकांच्या मनात असंतोषाचा ज्वालामुखी  उसळत असल्याचे वारंवार दिसून आले. 

भाजपच्या राज्यातील सत्ता काळात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक  आणि उजवे हात येथपर्यंत जाऊन पोहोचलेल्या गिरीशभाऊंनी फडणवीस यांचा नाथाभाऊंचे राजकारण थप्पीला लावण्याचा एककलमी अजेंडा  राबवला. त्यामुळे नाथाभाऊंना मानणाऱ्या मोठ्या जनसमुदायाची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. त्यातही “हम करे सो कायदा”, “ना खाता  ना  बही – हम कहे वो सही” या समांतर रुळावरुन गीतांजली एक्सप्रेसच्या वेगाने धावलेली भाजपा एक्सप्रेस आपल्याच लोकांना चेंगरते की काय? याचे भानही त्यांना राहिले नाही. जेव्हा आमदाराचा मंत्री होतो  तेव्हा  सत्ते भोवती कडेबोळे जमते. 

जमलेल्या भाऊगर्दीत जो तो आपल्या फायद्याचा अजेंडा घेऊन नेत्यांच्या मागेपुढे करतो. नेतेही वस्ताद असतात.  जमलेल्या लोकांच्या गर्दीत गोल्डमॅन, मसल पॉवर वाले, मनी पॉवरवाले, उद्योजक आणि त्यातही जातभाई विश्वासपात्र हस्तक यांचाच आवाज  मंत्र्याला ऐकू येतो. आजकाल सत्तारुढ – विरोधातले बहुतेक मंत्री – आमदार – लोकप्रतिनिधी हे एकाच कानाने ऐकतात. त्यांचा दुसरा कान सतत मोबाईलवर व्यस्त असतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी केवळ फायदेशीर उपक्रम ऐकण्यासाठी त्यांनी त्यांच्या खाजगी स्वीय सहाय्यक, उजवे हात बनलेले हस्तक, डाव्या हाताला बसणारे हस्तक, मनी मॅटर, मतदार बांधव, मतदार संघ हाताळणारे, सेवाभावी उपक्रम राबवणारे, फोनच्या एका इशाऱ्यावर हव्या त्या शहरात- हवे  तेथे शून्य मिनिटात हजारो- लाखो- करोडो रुपये उपलब्ध करण्याची क्षमता बाळगणा-यांची  फौज उभी करण्याचे कौशल्य मिळवल्याचे सांगितले जाते. 

या तंत्राचा भाग म्हणून मग गिरीशभाऊंच्या अष्टप्रधान मंडळात सुनील झवर नामक  विद्वानाचा अमात्य म्हणून समावेश झाल्याचे सांगतात. आर्थिक आघाडीवरील असे सेनापती नाशिक- मुंबई- जळगावसह थेट दिल्लीपर्यंत  यशस्वी मोहिमा राबवतात. त्यातून नाशिकचा कुंभ मेळा ( 2500 कोटी) किंवा वाटरग्रेस, स्थानिक आमदार असो किंवा 4 हजार कोटींच्या योजनांची सुखावणारी टेंडर्स असो यातून आर्थिक लाभ मिळवू पाहणाऱ्यांची नवउद्योजक कंत्राटदार ( ठेकेदारांची) गर्दी जमते. अलीकडे कार्यकर्ते हेच अनेक योजनांची ठेके मिळवण्यासाठी मैदानात उतरल्यामुळे या कोट्यावधीच्या वाहत्या गंगेतून  त्यांनाही काही मिळावे ही अपेक्षा योग्य ठरते. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या अनुयायांपैकी अनेकांना ठेकेदारीत आणून व्यवसायाच्या  मार्गाने धनसंपदा मिळवण्याचा मार्ग दाखवला. शिवाय एखाद्या शहरात व्यापारी संकुलासह आणखी काय काय करता येऊ शकते याचीही योजना आखून बऱ्याच गोष्टी करुन दाखवल्या आहेत. यापैकी गोलाणी मार्केट, सतरा मजली मनपा इमारत  अशा अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जाऊ शकतात. 

धनसंपदा बनवण्याच्या ” कॅट रेस” मध्ये त्यांची विकास एक्सप्रेस मध्यंतरी रुळावरून घसरली (की घसरवली?)  हा भाग वेगळा. जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत सुरेशदादा जैन – एकनाथराव खडसे- गिरीशभाऊ महाजन यांच्यातील राजकीय सत्ता संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. अलीकडे भाजप शिवसेनेत गिरीश भाऊ महाजन- गुलाबराव पाटील या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये  “गुलाबी गुलाबजाम” चविष्ट पणे खाण्याचे सख्य दिसते. परंतु जेव्हा आपला नेता हा एकटाच सर्व मिठाई खाऊन फस्त करण्यात गुंततो आणि सत्तेचा घाऊक  ठेकेदार या भूमिकेत वावरतो,  तेव्हा भाजप सारख्या बलाढ्य अशा राष्ट्रीय पक्षात बंडखोरी होऊ शकते. याचे ताजे उदाहरण म्हणजे मनपातील सत्तांतर नाट्य. भाजपची मनपातील सत्ता भाजपकडून हिसकावून शिवसेनेकडे सोपवण्यात नाथाभाऊंची भूमिका महत्त्वाची मानली जाते. नाथाभाऊंच्या मते त्यांनी मनात आणले तर  महिनाभरात भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद देखील ते खेचू शकतात. परंतु सध्या गिरीशभाऊ हे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नाथाभाऊंना टक्कर देऊ शकेल अशा त्यांच्यात समाजातील बदनाम फरिश्त्याला (कोट्याधीश) हवा देत आहेत. बीएचआर मल्टीस्टेट प्रकरणातील सुनील झंवर असोत  की अशाच कोट्यावधीच्या  घोटाळ्यातील आणखी कुणी असो त्यांना भाजपच्या लॉन्ड्रीत  धुऊन शुद्ध करून देण्याच्या उद्योगात घरच्या तिजोरीचा कानाकोपरा महात्मा गांधीच्या कागदांच्या गठ्ठ्यांनी भरण्यात  वाईट काय आहे? असे काही कार्यकर्ते खाजगीत बोलू लागले आहेत.

परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाच्या नेत्यांच्या कंपूशाही खेळात कार्यकर्त्यांच्या मात्र पोटावर मार पडू लागला आहे. त्याचा उद्रेक झाल्याने मनपात सत्तांतर घडले. मनपा निवडणुकीपूर्वी  त्याच क्षेत्रातल्या जुन्या प्रकरणात आपण 100 आजी माजी नगरसेवक “आत” घालू शकतो  असा दावा एका  नेत्याने केला होता. हे पाहता शहरात मनपा विकासासाठी लढणार की एकमेकांचे नेतृत्व संपवण्यासाठी? याचे उत्तर कोण देणार?

subhash-wagh

सुभाष  वाघ ( पत्रकार – जळगाव/ पुणे)

8805667750

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here