सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवा – देशातील बारा विरोधी पक्षांची मागणी

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधीं, ममता बॅनर्जी आदी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्या केल्या आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरणाची नितांत गरज आहे. या पार्श्वभुमीवर देशातील 12 प्रमुख विरोधी पक्ष प्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात महाराष्ट्राचे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं आदींचा समावेश आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करून त्यावर होत असलेला खर्च आरोग्य सुविधांवर करण्यात यावा ही प्रमुख मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. या पत्रात उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, जेडीएसचे एच. डी. देवेगौडा, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, सीपीआयचे नेते डी. राजा आणि सीपीआय-एमचे नेते सीताराम येचुरी आदींच्या सह्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात पुढील मुद्दे घेण्यात आले आहेत. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्यात यावे. या प्रकल्पाचा निधी लसीसह ऑक्सिजन खरेदीसाठी केला जावा. देशातून वा परदेशातून शक्य असेल तिथून लसींची खरेदी करावी. संपूर्ण देशात एकच लसीकरण अभियान राबवले जावे. देशात लसींचे उत्पादन घेण्यासाठी अनिवार्य लायसन्सिंग लागू केले जावे. लसींसाठी 35 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवावे. पीएम केअर फंड आणि सर्व खासगी फंडातील जमा रक्कम ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वापरली जावी. सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये दिले जावे. सर्व गरजूंना मोफत अन्न दिले जावे. कृषी कायदे मागे घेण्यात यावे ज्यामुळे कोरोना संकटात सापडलेले लाखो शेतकरी देशातील जनतेसाठी पिकांचे उत्पादन घेऊ शकतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here