निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई – जिल्हाधिकारी

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असूनही जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत असून परिणामी असे नागरिक स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही बाधित करतात. लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी करणारे नागरिक, कोरोना बाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईंक, अरुंद गल्ली बोळांत बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, काही नागरिक 7 ते 11 वाजेदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकानांवर विनाकारण गर्दी करणारे नागरिक यांच्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी 4 वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप करावे, म्हणजे दुस-या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. शिवाय सर्वांना लस उपलब्ध होईल. कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा विश्वास त्यांच्या नातेवाईंकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांमध्ये व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून द्यावा जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात येण्याचा आग्रह धरणार नाहीत. यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
विनाकारण फिरणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी यावेळी बोलतांना म्हटले. पुढे बोलतांना मुंढे म्हणाले की प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरीक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत असून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारावाईही करत आहेत. परंतु यापुढे अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर अधिकाधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस, गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. यापुढे नागरिकांनी अशाप्रकारे विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा गुन्हे दाखल सारख्या कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिला. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याने नागरीकांनी त्यास महत्त्व देऊन आपल्यासह सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here