पाचोरा येथे कॉग्रेसच्या वतीने शिवसेनेच्या आमदारांचा निषेध

पाचोरा : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असुन यात कॉग्रेस हा मुख्य घटक पक्ष आहे. पाचोरा कृ.उ. बा.समिती प्रशासक पदावर कॉग्रेसला डावलण्यात आले आहे. कृ.उ.बा. समिती प्रशासक पदी कॉंग्रेसला डावलण्याचे काम शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी केल्याचे कॉंग्रेस पदाधिका-यांचे म्हणणे आहे. या घटनेचा पाचोरा कॉग्रेस पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निषेध केला आहे. पालकाने पालक व्हावे बालक होऊ नये असा इशारा कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिला आहे. भडगाव रस्त्यावरील नवकार प्लाझा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत सचिन सोमवंशी बोलत होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना सचिन सोमवंशी म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करत आहेत. असे असतांना पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आ. किशोर पाटील हे आघाडीचे प्रमुख अर्थात पालक आहेत. परंतु काही घटना अशा घडल्या आहेत की ते पालक असून पालकासारखे न वागता बालकासारखे वागत आहेत.

कॉग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलतांना पुढे म्हटले आहे की पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले. यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये पाचोरा विश्रामगृहात एक गोपनिय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे आ. किशोर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ होते. या दोघांनी पक्षांचे प्रशासक म्हणून कोणते पदाधिकारी घ्यायचे हे ठरवले. त्यानंतर यालाही शिवसेना आ. किशोर पाटील यांनी तिलांजली देत स्वतः च्या पक्षाच्या 18 पदाधिका-यांची यादी 14 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना स्वतः च्या लेटरहेडवर दिली.

मात्र तत्कालीन संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्यामुळे त्यास स्थगिती मिळाली. त्यामुळे हा विषय जैसे थे राहीला. मात्र पुन्हा शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजी शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप वाघ यांच्या सह पाच जणांची यादी पाठवली. यावेळी कॉग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतांना आम्हाला विश्वासात न घेता कॉग्रेसला डावलण्याचा प्रकार करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध करतो असे सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे.

आ. पाटील यांनी महाविकास आघाडीत ठिणगी पाडू नये. याचा वनवा महाराष्ट्रात पेटेल आणि महाविकास आघाडीचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होईल असे काही करु नये अशी आमची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांना देखील या बाबतीतची लेखी तक्रार देण्यात आली आहे. नवीन प्रशासक मंडळात अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावलले हे देखील महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात आ. पाटील यांनी कॉग्रेसला दुजाभावाची वागणूक देऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, महिला आघाडीच्या शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here