एरियाच्या कथित दादांचा तिघांवर जिवघेणा हल्ला

जळगाव : आम्ही या एरीयाचे दादा आहोत असे धमकावत तिघांवर प्राणघातक हल्ला करणा-या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकू, साखळदंड व लोखंडी रॉडचा या गुन्ह्यात वापर करण्यात आला आहे.

एमआयडीसी हद्दीतील सुप्रिम कॉलनी भागात बापू पारधी व ज्ञानेश्वर कोळी या दोघांना अजय भास्कर विश्वे, आकाश भास्कर विश्वे, भास्कर गंगाराम विश्वे व सविता भास्कर विश्वे असे चौघे जण मारहाण करत होते. या घटनेची माहिती राहुल पाटील याने किरण शामराव चितळे याला सांगितली. माहिती मिळाल्यानंतर परिचीत असलेल्या बापु पारधी व नाना कोळी या दोघांची मारहाण करणा-या चौघांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी किरण चितळे घटनास्थळी शारदा हायस्कुलजवळ गेला.

त्याठिकाणी आकाश विश्वे, भास्कर विश्वे, अजय विश्वे, भास्करची पत्नी असे चौघे जण हजर होते. किरण यास पाहताच आकाश विश्वे त्याला म्हणाला की तु आमच्या एरीयामध्ये का आला? त्यावर लागलीच अजय विश्वे म्हणाला की बरे झाला हा इकडे आला. आता याला मी जिवंत सोडणार नाही. काही कळण्याच्या आत अजयने त्याच्या हातातील लोखंडी साखळदंड जोरजोरात फिरवण्यास सुरुवात केली. ती जड साखळी किरणच्या डोक्याला लागून जखम झाली. साखळीचा दुसरा वार डोक्यावर बसण्याआधी प्रसंगावधान राखत किरणने आपला जिव वाचवत तेथून पळ काढला.

वाटेत त्याचा मित्र विजु पाटील याने त्याला त्याच्या मोटारसायकलने एमआयडीसी पोलिस स्टेशनला व तेथून सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी जखमी अवस्थेत बापू पारधी व ज्ञानेश्वर कोळी हे दोघे जण देखील दाखल होते. आमच्या एरियात का आला म्हणून जाब विचारत आकाशने बापु पारधी यास चाकूने जखमी केले होते. भास्करच्या पत्नीने त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली होती. भास्कर याने ज्ञानेश्वर कोळी यास लोखंडी रॉड फेकून मारल्याने तो जखमी झाला होता. तिघा जखमींना सामान्य रुग्णालयातून गोदावरी हॉस्पीटलमधे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी किरण चितळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 251/21 भा.द.वि. 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भास्कर व त्याच्या पत्नीला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर आकाश याला देखील अटक करण्यात आली.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांचे सहकारी सहाय्यक फोजदार अतुल वंजारी, पो.कॉ. हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सुधीर साळवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विजय गायकवाड करत आहेत. अजय विश्वे हा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here