जप्त तारण मालमत्तेवर कब्जा – दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : गृह कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तारण ठेवलेल्या व जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकलाल परदेशी व संगिताबाई परदेशी या दाम्पत्याने शुभम हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीच्या जळगाव शाखेकडून सुमारे चौदा लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. या गृहकर्जाचे कर्जदारांनी हप्ते भरले नाही. त्यामुळे या कर्जाची रक्कम 26 लाखाच्या घरात गेली होती. त्यामुळे फायनान्स कंपनीने सरफेशी कायद्यानुसार सदर मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. महसुल विभागाकडून रितसर पुर्तता झाल्यानंतर फायनान्स कंपनीने या गृह मालमत्तेचा ताबा स्वत:कडे घेत आपले कुलूप लावले.

दरम्यान कंपनीचे वसुली अधिकारी पंकज पांडे व आशिफ इकबाल हे विटनेर या गावी या गृह मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना कंपनीने लावलेले कुलुप तुटलेले दिसले. त्या घरात कर्ज थकबाकीदार सुकलाल परदेशी व त्यांची पत्नी संगिता परदेशी हे रहिवास करतांना आढळून आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here