मुंबई : देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यामुळे सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या पासपोर्ट नूतनीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पासपोर्ट नुतनीकरण नसल्यामुळे चित्रपटाच्या शुटींगसाठी बुडापेस्टला तिचे जाणे रखडले आहे. या प्रकरणी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र तिला तेथेही दिलासा मिळाला नाही.
धाकड या चित्रपटाच्या शुटींगसाठी कंगनाला बुडापेस्टला जायचे आहे. मात्र तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पासपोर्ट विभागाने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणाचे काम थांबवले आहे. याप्रकरणी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात तिच्या वतीने अॅड. रिझवान सिद्दीकी व चित्रपटाचे निर्माते अॅड. हृषीकेश मुंदर्गी यांनी सांगितले की, चित्रीकरणाचे वेळापत्रक पुर्वनियोजीत आहे. कंगना बुडापेस्टला पोहोचली नाही तर दर दिवसाला पंधरा लाख रुपयांचे नुकसान होत आहे.
प्रसिद्ध गितकार जावेद अख्तर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कंगना विरुद्ध अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली बदनामी करत प्रतिष्ठा मलिन केल्याचा जावेद अख्तर यांचा आरोप आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 जून रोजी ठेवण्यात आली आहे.