ज्याने दिला निवारा, त्याच्या जिवाचे वाजवले बारा! खूनी अजिंक्यच्या नशीबी आला जेलचा तप्त वारा!!

धुळे : रमेश हिरालाल श्रीराव हे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या कुसुंबा शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या रमेश श्रीराव यांना कसलेच व्यसन नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुष्यात चांगल्याप्रकारे बचत केली होती. त्यांची पत्नी प्रमिला या धुळे तालुक्यातील मेहेरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका आहेत. रमेश श्रीराव यांची पेन्शन आणि पत्नी प्रमिला यांचा पगार असे उत्पन्नाचे दुहेरी स्त्रोत त्यांच्याकडे होते. त्यामुळे श्रीराव दाम्पत्य सुखात जिवन व्यतीत करत होते. धुळे शहराच्या चितोड रोड लगत ‘राजहंस’ कॉलनीत रमेश श्रीराव यांनी “आशिर्वाद” नावाची एक टोलेजंग इमारत बांधली होती. या इमारतीत ते पत्नी प्रमिलासह रहात होते. त्यांच्या दोन्ही विवाहीत मुली सासरी सुखाने संसार करत आहेत. एकंदरीत रमेश श्रीराव यांचे सेवानिवृत्त जिवन व्यवस्थित सुरु होते.

मयत रमेश श्रीराव

श्रीराव दाम्पत्याने त्यांच्या इमारतीचा खालचा मजला शिवनाथ मेमाने यांना भाड्याने दिला होता. शिवनाथ मेमाने हे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भोये येथील मुळ रहिवासी होते. शिवनाथ मेमाने हे नजीकच्या जुन्नर गावातील मुकबधीर शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. नोकरी निमीत्त शिवनाथ मेमाने धुळे येथे राहण्यास आले. शिवनाथ मेमाने यांची दोन्ही मुले परगावी शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मेमाने यांचा अजिंक्य नावाचा मुलगा त्यांच्याकडे काही महिन्यापासून राहण्यास आला होता.   

रमेश श्रीराव यांना सेवानिवृत्तीनंतर बरेच पैसे मिळाले होते. ते पैसे त्यांनी बँकेतच ठेवले होते. रमेश यांची पत्नी प्रमिला यांची नोकरी सुरु असल्याने त्यांच्या पगारात घरखर्च भागून रक्कम शिल्लक रहात होती. तरीदेखील अधिक उत्पन्नासाठी त्यांनी शिवनाथ मेमाने यांना खालच्या मजल्यात भाडेकरी म्हणून ठेवले होते. भाडेकरी मेमाने यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथील घर विकून टाकले होते. ते श्रीराव यांच्या घरात भाडेकरी म्हणून रहात होते. कोरोनाचा कहर लक्षात घेता शिवनाथ मेमाने यांचा अजिंक्य नावाचा मुलगा गेल्या चार महिन्यापासून वडीलांकडे धुळे येथे राहण्यास आला होता. अजिक्य हा जणूकाही रमेश श्रीराव यांचा काळ बनूनच धुळे येथे आला होता.

रमेश आणि त्यांची पत्नी प्रमिला या दोघांना अजिंक्य प्रत्येक कामात मदत करत होता. बाजाराला जातांना श्रीराव मदतीसाठी त्याला सोबत घेऊन जात होते. बॅंकेत पैसे काढण्यासाठी जातांना देखील ते त्याला सोबत घेऊन जात होते. त्यामुळे काही दिवसातच अजिक्य हा रमेश श्रीराव यांचा जणूकाही बालमित्र झाला होता. श्रीराव यांची पत्नी शाळेत नोकरीला गेल्यानंतर ते एकटेच घरात रहात होते. त्यामुळे ते गप्पागोष्टी करण्यासाठी अजिंक्यला बोलावून घेत होते. रमेश श्रीराव यांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याची व घरी परत आल्यावर गच्चीवर प्राणायम करण्याची सवय होती.

रमेश श्रीराव हे अजिंक्य मेमाने याच्यासोबत गप्पा करतांना त्यांच्या आयुष्यातील चढ – उतार आणि संघर्ष कथन करायचे. आपले दोन्ही जावई देखील आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे त्यांना आपल्यापासून कुठली अपेक्षा नसल्याचे ते अजिंक्य यास सांगत असत. व्यसन नसल्यामुळे आपली बरीच रक्कम शिल्लक असल्याचे देखील ते अजिंक्यला नेहमी सांगत होते. एकंदरीत रमेश श्रीराव यांच्याबद्दलच्या ब-याच गोष्टी अजिंक्यला माहिती झाल्या होत्या. रमेश श्रीराव यांची बरीच रक्कम बॅंकेत पडून असल्याचे त्याला समजले होते. या रकमेचे करावे काय? हा श्रीराव यांच्या मनात प्रश्न असल्याचे देखील त्याला समजले होते.

याउलट अजिंक्य मेमाने याच्या वडीलांची परिस्थिती होती. अजिंक्य मेमाने याचे वडील शिवनाथ मेमाने हे आर्थिक दृष्ट्या खचलेले होते. त्यांचा पगार जेमतेम होता. त्यातच कोरोना व लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. रमेश श्रीराव यांचे घरभाडे देखील त्यांच्याकडून व्यवस्थीत दिले जात नव्हते. गेल्या चार महिन्याचे घरभाडे थकीत झाले होते. ते घरभाडे आज मिळेल – उद्या मिळेल या आशेवर रमेश श्रीराव थांबले होते. मात्र मेमाने यांच्याकडे घरभाडे बाकीच होते. हळूहळू श्रीराव यांच्या मनाचे परिवर्तन होवू लागले. त्यांनी मेमाने पिता पुत्रांकडे थकीत घरभाडे मागण्याचा तगादा सुरु केला. शिवनाथ मेमाने यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन होते. घरभाडे देण्यास पैसे नाही व सिगारेटसाठी पैसे कसे काय येतात असे श्रीराव त्यांना खोचकपणे बोलू लागले. हा दोघा पितापुत्रांचा एक प्रकारे अवमान  होता. मात्र शिवनाथ मेमाने यांची पडती बाजू असल्यामुळे ते श्रीराव यांचे बोलणे सहन करत होते. आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना भाड्याचे दुसरे घर शोधणे व बदलणे शक्य नव्हते.

नितीन देशमुख पोलिस निरीक्षक, दादासाहेब पाटील सहा.पो.नि., तुषार मोरे पो.कॉ.

आपल्या घरची परिस्थीती अजिंक्यला चांगल्याप्रकारे माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना देखील फार बोलू शकत नव्हता. या सर्व घडामोडी बघून अजिंक्य बेचैन राहू लागला. तो आता घरमालक रमेश श्रीराव यांना टाळू लागला. पुर्वीसारखी त्यांची भेट घेणे त्याला नकोसे झाले होते. आपल्या आर्थिक परिस्थितीचा तिढा कसा सुटणार ही चिंता अजिंक्यला सतावत होती. त्यातूनच त्याच्या मनात कुविचार येण्यास सुरुवात झाली. रमेश श्रीराव यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असतांना देखील ते घरभाड्यासाठी सारखा तगादा लावत होते. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार अजिंक्यला माहिती होते. त्यामुळे त्याच्या मनात कुविचाराने काहुर माजवण्यास सुरुवात केली होती. थकलेल्या  घरभाड्यासाठी ते आपला अपमान करतात याची सल अजिंक्यच्या मनात होती. त्यांच्या घरातील प्रत्येक घटकाची अजिंक्यला ओळख होती. त्यांच्या घरातील पैसे, दागिने, कपाट या सर्व गोष्टी अजिंक्यला माहिती होत्या. घरमालक रमेश श्रीराव आणि त्यांची शिक्षीका पत्नी यांची हत्या केली तर आपला अपमान संपेल व त्यांची धनसंपदा देखील आपल्याला मिळेल असा कुविचार त्याच्या मनात चमकून गेला. तो विचार लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्या.

22 जून 2021 रोजी नेहमीप्रमाणे रमेश श्रीराव मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर गेले. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर ते घरी आले. आल्यानंतर ते नेहमीप्रमाणे गच्चीवर प्राणायम करण्यासाठी गेले. ते प्राणायम करण्यात व्यस्त असल्याची संधी साधत अजिंक्य गच्चीवर आला. हातातील लोखंडी फावडा त्याने मागच्या बाजूने रमेश श्रीराव यांच्या डोक्यावर जोरात हाणला. या जबर प्राणघातक हल्ल्यामुळे रमेश श्रीराव जखमी अवस्थेत गच्चीवर कोसळले. ते खाली कोसळताच लोखंडी पाईपाचा एक जोरदार फटका त्याने श्रीराव यांच्या डोक्यात हाणला. या दोन हल्ल्यात रमेश श्रीराव कायमस्वरुपी देवाघरी गेले.

आरोपी अजिंक्य मेमाने

दरम्यान त्यांची पत्नी किचनमधे स्वयंपाक करण्यात मग्न होती. त्याचवेळी तो किचनमधे दाखल झाला. किचनमधील काटेरी चमचा त्याने प्रमिला श्रीराव यांच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत सावध झालेल्या प्रमिला श्रीराव यांनी तो हल्ला शिताफीने चुकवला. पुर्ण ताकदीनिशी त्यांनी अजिंक्यला दुर लोटले. घराबाहेर  येत त्यांनी परिसरातील लोकांना जोरजोरात मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. आजुबाजूच्या लोकांनी धावून येत अजिंक्यला पकडले. एवढा आरडाओरड होऊन देखील रमेश श्रीराव गच्चीवरुन खाली का येत नाही म्हणून त्यांना बघण्यासाठी लोक गच्चीवर गेले. मात्र तेथील भयावह दृश्य बघून अनेक जण गांगरले. रक्ताच्या थारोळ्यात रमेश श्रीराव निपचीप पडले होते. परिसरातील लोकांनी अजिंक्यला पकडून ठेवले होते.

कुणीतरी या घटनेची माहिती धुळे शहर पोलिस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच पो.नि. नितीन देशमुख आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्गासमवेत घटनास्थळी दाखल झाले.  रितसर कायदेशीर बाबी त्यांनी पुर्ण केल्या. या घटने प्रकरणी प्रमिला श्रीराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे शहर पोलिस स्टेशनला अजिंक्य मेमाने याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अजिंक्य मेमाने याला अटक करण्यात आली. ज्या घरमालकाने राहण्यास भाड्याने घर दिले त्याचाच भाडेक-याच्या मुलाने खून केला होता. या भयावह घटनेमुळे परिसर सुन्न झाला.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, संतोष तिघोटे, हेमंत राऊत, नाना आखाडे, कॉन्स्टेबल भिका पाटील, मुक्तार मन्सुरी, मनिष सोनगरे, कमलेश सुर्यवंशी, अविनाश कराड, नितीन अहिरे, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, संदीप पाटील, सतिश कोठावळे, प्रविण पाटील, जगदीश पाटील, पो.कॉ. तुषार मोरे आदींनी पुर्ण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here