संत मुक्ताई संस्थानच्या पंढरपुरातील जमिनीचे काय?

संत ज्ञानेश्वरांइतकेच आदिशक्ती संत मुक्ताई यांच्यावर श्रद्धा ठेवणारे  कोट्यावधी देशभक्त महाराष्ट्रात आहेत.  पौराणिक कथेत वर्णन केल्याप्रमाणे कथित  गर्विष्ठ साधू चांगदेव यांचा गर्वहरण करण्यासाठी  भिंतीवर बसून खानदेशात आलेली हि भावंड थेट खानदेश – विदर्भ पट्ट्यात श्रद्धास्थान बनली. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व टोकाला असलेल्या जुन्या एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) जवळ चांगदेव मंदिर आहे. लगतच संत मुक्ताबाई यांचे मंदिर जुनी कोथळी या स्थळी आहे. याच मुक्ताई देवस्थानाच्या  मालकीची जमीन (एक भला मोठा भूखंड) पंढरपूर शहरात असल्याची देवस्थान ट्रस्टची नोंद सांगते. विशेष म्हणजे खानदेशात जुन्या एदलाबाद व आताचे मुक्ताई नगर परिसरात संत मुक्ताईची तीन मंदिरे आहेत. त्यातील जुने कोथळी, मेहून व बोदवड रस्त्यावर मुक्ताईभक्त स्वर्गीय प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांनी उभारलेले तिसरे मंदिर आहे. आमचेच मुक्ताई मंदिर ओरिजनल असल्याचे तीन दावे करणारे राजकारण मध्यंतरी खानदेशात रंगले.

खानदेशच्या राजकारणात 1960 नंतर पदार्पण करणाऱ्या तत्कालीन काँग्रेस नेत्या सौ. प्रतिभाताई पाटील यांनी उपजत मृदु स्वभावासोबत भक्कम काँग्रेसनिष्ठा  जपत राजकारणात मंत्री पदे उपभोगली. त्यांना कधी मंदिर पॉलिटिक्स करावे लागले नाही. त्यांचा जन्मच नाडगाव – बोदवड येथील असल्यामुळे त्यांना भक्कम जनाधार इथेच लाभला. बोदवड भागातीलच मनुर बुद्रुकचे प्रल्हादराव पाटील जिल्हा बँकेवर संचालक होते. तब्बल सहा फूट उंचीचे व मधुर वाणी लाभलेले हे देखील मुक्ताई भक्त होते. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी टिळा, अंगात पांढरा काँग्रेसी गणवेश असणारे प्रल्हादराव आताचे रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांचे खानदेशातील पहिले विश्वासू शिष्य म्हटले जातात. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकारावर पकड ठेवणाऱ्या जिल्हा सहकारी बँक ते राज्य शिखर बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत जाऊन पोहोचले. त्यांना आमदारकीची इच्छा झाली. त्याच वेळी बोदवडचे हरिभाऊ जवरे राजकारणात पुढे आले. ते आमदारही झाले.

स्वर्गीय प्रल्हादराव पाटील, स्वर्गीय हरिभाऊ जवरे या दोघांनी मुक्ताईनगर परिसरातल्या संत मुक्ताबाई भक्तांसह वारकरी संप्रदायाचा आदरच केला. प्रल्हादरावांपेक्षा  हरिभाऊंना प्रॅक्टिकल पॉलिटिक्स लवकर उमजले. दोघांना जुन्या कोथळी मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या नावाने कोट्यावधी विठ्ठल भक्तांचे  श्रद्धेय मंदिर असणाऱ्या पंढरपूर शहरातील भुखंडाची माहिती होतीच. त्या काळात होऊ घातलेल्या हतनुर धरणामुळे विस्थापित होणाऱ्या जुन्या कोथळी – एदलाबाद चांगदेव मानेगाव आदी गावांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर कधीकाळी प्रतिभाताईंनी जनमतावर राज्य गाजवले. सन 1985 नंतर राज्यात अवतरलेल्या शरद पवारांच्या “काँग्रेस – एस” ने खानदेशात मुसंडी मारली. 1990 नंतर भाजपतर्फे एकनाथराव खडसे यांचे राजकारणात आगमन झाले. अभ्यासूवृत्ती सोबत आक्रमक स्वभावाचे एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व खानदेशसह राज्यात गाजले. सेना-भाजपच्या हिंदुत्वाच्या 1995 च्या लाटेत एदलाबादचे मुक्ताईनगर नामांतर करुन नाथाभाऊंनी वारकरी संप्रदायाच्या मनावरही पकड घेतली.

हतनूर धरणाच्या बॅकवॉटरच्या फटक्याने बुडणाऱ्या पूरग्रस्त क्षेत्रात जुनी कोथळी गाव, मुक्ताई मंदिर परिसर, एदलाबाद आल्याने त्यांची पुनर्वसने झाली. हे असे होणार हे हेरुनच प्रल्हादराव पाटील यांनी स्थलांतरीत शहरालगत संत मुक्ताईचे भव्य मंदिर बांधले. त्यानंतर संत मुक्ताई मंदिरापैकी आद्य मंदिर कोणते? असा वाद माजवण्याचा राजकीय डाव रंगला. याच राजकीय वादात मुक्ताई मंदिर देवस्थानाची इनामी जमीन कुणी कुठे गहाण तर ठेवली नाही ना? या टोकदार प्रश्नाद्वारे प्रल्हादरावांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाला रोखण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन एका मंत्र्याने या राजकीय हवेत एका शिक्षण संस्थेचे कॉलेज  हडपण्याचा डाव खेळला. जिल्हा बँकेची सत्ता मिळवली मुक्ताई भक्ताला छळले व सारे  गमावले.

म्हणजेच संत मुक्ताई देवस्थानच्या  पंढरपुरातील तत्कालीन काही कोटी रुपये किमतीच्या भुखंडावर वारकरी भवन, धर्मशाळा बांधण्याची आश्वासने जोरात असतांना तोच भूखंड बळकावण्याचे राजकारण झाल्याचे सांगितले जाते. यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी काही राजकारणी संत मुक्ताईची आरती करणे, पालखीला नमन करणे, मुक्ताई भक्तांना सेवेकरी म्हणून सेवा दान करणे, टाळ मृदंग वाजवून कीर्तनकार बनणे अशा अवतारात दिसून आले. संत मुक्ताई यांचे खरे भक्त कुणी बनत असेल तर त्यास कुणाची हरकत नसावी. तथापि मुक्ताई भक्तीचा देखावा मांडणा-यांवर आदिशक्तीचा कोप होतोच अशीही या भागात श्रद्धा आहे. आता आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर परिसरात तीस एकर जागेवर राज्यभरातील पालख्यांचे स्वागत होईल. मुक्ताईनगरातील एक श्रद्धेय मुक्ताई पालखी त्यात आहे. आदिशक्ती मुक्ताईसह वारकरी बांधवांचा लाडका विठोबा सगळ्यांना सद्बुद्धी व आशीर्वाद देवो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here