गुरुपौर्णिमेचे निमीत्त साधत फसवणूक करणारे दोघे भोंदू औरंगाबादला अटक

औरंगाबाद : गुरुपौर्णीमेचे निमित्त साधून भिक्षा मागत भविष्य सांगण्याचे नाटक करत फसवणूक करणा-या दोघा भोंदूंना औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहरनगर भागातून अटक केली आहे. योगेश खंडू सोळंके (27) व विश्वनाथ नारायण शिंदे (32) अशी अटकेतील दोघा आरोपीतांची नावे आहेत.

सिडको एन-4 येथील रहिवासी असलेल्या चेतना भावसार या 23 जुलैच्या सकाळी त्यांची आत्या रहात असलेल्या जे सेक्टरमधे गेल्या होत्या. या दिवशी गुरुपौर्णीमा होती. गुरुपौर्णीमेचे निमीत्त साधत त्याठिकाणी दोन भोंदू साधू उभे होते. या दोघा भोंदूंनी त्यांच्याजवळ चहाची मागणी करत थेट घरात प्रवेश केला. त्यानंतर पुजा व भविष्य कथन करण्याचा ड्रामा सुरु केला. दरम्यान त्यांनी चेतना भावसार यांच्या हातावर कुंकू देत हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी दोघा भोंदूंनी ताब्यात घेत पलायन केले.

या घटनेप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अशाच पद्धतीने जिन्सी परिसरात एका महिलेच्या घरातून आठ हजार रुपये लुटीचा प्रकार समोर आला. या घटनेप्रकरणी देखील जिन्सी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. या घटनांची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्यासह पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तक्रारीत नमुद केलेल्या भोंदूंच्या वर्णनाप्रमाणे दोघे भोंदू श्रीकृष्ण नगरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल देशमुख यांच्यासह अंमलदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी सापळा रचत दोघा भोंदूना एका सुशिक्षित परिवाराच्या घरातून बाहेर पडताच ताब्यात घेतले. दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला योगेश व त्याचा साथीदार विश्वनाथ फेटा, कवड्याची माळ, भगवे कपडे अंगावर चढवून फिरत होते. अंगावर कातडी पिशवी, खंजीर वाद्य, सोबत देवी देवतांच्या मूर्ती, तांदूळ, खोबरा वाटी, हळद, राशीचे खडे, रुद्राक्ष असा एवज दोघे जण सोबत बाळगत होते. कपाळावर भले मोठे भस्म व गंध लावून केवळ स्त्रीया असलेल्या घरातच प्रवेश करत होते.

भस्म व कुंकवाने पूजा केल्याचे नाटक करत बोलबच्चन वापरत महिलांना भुरळ घालण्याचे काम करत होते. जिन्सी परिसरात भस्म, कुंकू उडवल्यानंतर एका विवाहीतेने दोघांना साडेसात हजार रुपये, तेलाच्या पिशव्या व मीठ देऊ केले. घरी आलेल्या जावयाला देखील या महिलेने पाचशे रुपये देण्यास सांगितले. मात्र नंतर आपली फसवणूक झाली असल्याची जाणीव या महिलेला झाली. त्यानंतर दोघे भोंदू श्रीकृष्ण नगरातील एका चांगल्या परिवारात गेले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना घराबाहेर येताच ताब्यात घेतले. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असल्याची दोघांना जाणीव होताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ते रहात असलेल्या झोपडीतून दोन अंगठ्या, 8 हजार रुपये रोख असा ऐवज जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here