मद्यपी मुलाचा बापाला रोजचा त्रास होता फार! — शिर कापून धड तलावात फेकत केले गप्पगार!!

crimeduniya
[email protected]

सांगली : सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील कवलापुर येथे विलास बापू सरगर या शेतक-याचा आपल्या परिवारासह रहिवास आहे. त्यांचा मुलगा विजय हा आता तरुण झाला होता. मात्र तो काहीही कामधंदा करत नव्हता.  विजयने काहीतरी कामधंदा करावा म्हणून बाप विलास त्याला नेहमी सांगत असे. विजयचे शिक्षण कमी असल्याने त्याला चांगली नोकरी कुठे मिळेल याची शाश्वती विलास यांना नव्हती. आपल्या घरची परिस्थिीती ओळखून ते त्याला कामाला जा, चार पैसे तुझ्यापुरते तरी मिळव. आणखी एक दोन वर्षात चांगली मुलगी बघून तुझे लग्न करुन देतो असे ते त्याला सांगत होते. पण विजय मात्र कोणताही कामधंदा न करता दिवसभर नुसता चकाट्या मारत रहात होता. मित्रांच्यबरोबर उनाडक्या करत फिरत होता. त्यातूनच त्याला मद्यपानाची सवय जडली होती. सुरुवातीला त्याची मद्यपानाची सवय ही त्याच्या आई वडिलांना माहित नव्हती. मुलगा आहे. त्याला काही कामधंदा नाही, म्हणून ते तो मागेल त्यावेळी त्याला पैसे खर्चासाठी देत होते. तो मात्र मिळालेल्या पैशातून मद्यपान करत होता. तर कधी कधी मित्रांबरोबर पत्त्यांचा डाव देखील खेळत होता. त्यातून तो कर्जबाजारी झाला होता. अलिकडे तर तो मोठ्या प्रमाणात मद्यपान करुन घरी येत होता.

घरात आई वडिलांसोबत भांडण उकरुन काढत होता. खर्चाला पैसे दिले नाही तर तो त्यांना मारहाण करण्यास देखील मागे पुढे बघत नव्हता. आपला मुलगा विजय हा वाईट मुलांच्या संगतीने बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. विलास यांच्या ते लक्षात आल्यावर गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी त्याला आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास पाठवले. तेथे विजय जास्त दिवस राहू शकला नाही. तो लगेच आपल्या कवलापूर गावी परत आला. गावी आल्यावर देखील त्याच्या वागण्यात काही फरक पडला नाही. तो दारुसाठी पैसे कमी पडले की आपल्या आई वडिलांना त्रास देवून त्याच्याकडून मागत होता. त्यांनी त्याला पैसे दिले नाही तर तो त्यांनाच मारहाण करण्यास मागे पुढे बघत नव्हता.

आता मात्र विजयच्या असल्या वागण्यामुळे त्याच्या आई वडिलांच्या डोक्यावरून पाणी गेले होते. त्यांनी त्याला कितीही समजावून सांगितले तरी तो काही त्याचे ऐकत नव्हता. विजय घरात दारु पिऊन आला म्हणजे त्याची घरात भांडणे ही ठरलेलीच होती. त्यामुळे ते देखील त्याच्या वागण्याला वैतागले होते. त्यांना ही काय करावे सुचत नव्हते. मुलाच्या पायात बापाची चप्पल आली की बापाने ही समजून जावे की मुलगा आता मोठा झाला आहे तो काही लहान राहिलेला नाही. आणि मुलाने ही आई वडिलाच्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे. स्वत:ची जबाबदारी ओळखून राहिले पाहिजे याचे भान विजयला नव्हते.

तो वाईट मित्रांच्या संगतीने दिवसागणिक बिघडत होता. त्याच्यामुळे घरात भांडणे होत होती. विजयला कामधंदा कर म्हटले की तो दारु पिऊन घरात धिंगाणा घालत होता. ही गोष्ट बाप म्हणून विलास सरगर यांना खटकत होती. विजयची आई मात्र त्याचे अपराध आपल्या पोटात घालत होती. तो काही सुधारण्याची चिन्हे दिसत नाही म्हणून विलास सरगर यांनी विजय बाबत आपला नातेवाईक उत्तम मदने यांना ही सांगितले होते. उत्तम मदने हे सांगोला जवळील कोळे येथे रहात होते. ते विलास सरगर  याचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचेही कवलापूर येथे सारखे येणे जाणे असायचे. त्यांनीदेखील विजयला बऱ्याचदा समाजावून पाहिले. परंतु त्यांच्या सांगण्याचा देखील विजयवर काही फरक पडला नाही. उलट तो त्याच्या आईवडीलांना दोष देत होता. माझ्या वागण्याचे तुम्ही नातेवाईकांना सांगून तुम्ही माझी अब्रु काढत आहात, असे म्हणून त्यांचेसोबत वाद घालण्याचे काम करत होता.

बाप म्हणून विलास सरगर यांना विजयची चिंता लागली होती. काही दिवसांपुर्वी विजयने आपल्या आई वडिलांसोबत वाद घालून त्यांना जबर मारहाण केली होती. याचा राग बाप म्हणून विलास सरगर  यांना आलेला होता. मी याला जन्म दिला आहे की याने मला जन्म दिला आहे असे म्हणत ते स्वत:च्या नशिबाला कोसत होते. त्यांनी परत एकदा उत्तम मदने बाला बोलावून घेऊन तुच बाबा यातून काही तरी मार्ग काढ असे सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी विजयबाबत एक वेगळाच विचार केला. विजयला आता कायमचेच गार केले म्हणजे आपल्या मागची पिडा जाईल असे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी विजयचा गेम करायचे ठरवले.  बाप म्हणून मुलाला ठार करण्यास विलास सरगर यास जड जाणार होते. त्याचे मन ही त्यासाठी तयार होत नव्हते. परंतू विजयच्या त्रासाला ते कंटाळले असल्याने त्यांनी पाहुणा उत्तम मदने याला काहीही करुन विजयला सपंव असे सांगितले.

विजयचा बाप विलास सरगर, नातेवाईक उत्तम मदने यांनी प्रकाश गोरख कोळेकर, संतोष विठ्ठल पांढरे, वैभव तानाजी आलदर या तिघांच्या मदतीने विजय सरगर यास ठार करण्यचे नियोजन केले. या पाचही जणांनी मिळून विजय यास एकांतात बोलावून ठार करण्याचे नियोजन केले. 11 जुलै रोजी स्वस्तात डाळींब खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याला वाहनासह बोलावण्यात आले. विजय आल्यावर कोळा येथील हॉटेलवर सर्वांनी जेवण केले. त्यानंतर रात्री कराडवाडीपासून काही अंतरावरील गौळवाडीनजीक मैदानात त्याला नेण्यात आले. तेथे सर्व संशयीत मारेक-यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. विजयचे शिर कापून त्याचा खून करण्यात आला. शिरविरहीत त्याचा मृतदेह चटई व शेडनेटमधे बांधण्यात आला. बांधलेला मृतदेह नंतर दगडाने बांधून बुद्धेहाळ तलावात टाकून देत सर्व मारेकरी पसार झाले.

दोन दिवसांनी विलास सरगर गावाकडे आला. गावात आल्यावर त्याने आपला मुलगा विजय बेपत्ता झाल्याचे नाटक सुरु केले. विजय बेपत्ता असल्याची माहीती त्याने 18 जुलै रोजी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. मुलगा विजय विलास सरगर  (21) हा दारुच्या नशेत भांडण काढत घरातून 15 जुलै रोजी गेला असून अद्याप परत आला नसल्याची त्याने तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार बेपत्ता विजयचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान सांगोला पोलीसांना बुद्धेहाळ तलावात एका तरुणाचा शिरविरहीत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे फोटो सर्व पोलीस स्टेशनला पाठवून ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. पोलिसांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात खबरींची मदत घेत तपासकाम काम सुरु केले.

दरम्यानच्या कालावधीत फोटोतील तरुणाचे वर्णन बेपत्ता विजयशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले. त्यामुळे सोमवार 26 जुलै रोजी सांगली ग्रामीणचे पोलिस पथक कवलापूर येथे जावून विलास सरगर  याच्याकडे बेपत्ता विजयची चौकशी करु लागले. मात्र तो पोलीसांना काहीच माहिती देत नव्हता. तसेच त्याची पत्नीदेखील पोलीसांना काहीच सांगत नव्हती. पोलीसांनी त्याला सांगोल्याजवळ सापडलेल्या मृतदेहाचे फोटो देखील दाखवले. मात्र तो आपला मुलगाच नाही असे त्याने पोलीसांना सांगितले. विलास सरगर काही तरी माहिती आपल्यापासून लपवत असल्याची शंका पोलीसांना आली.

पोलीसांनी विलास सरगर  यांना पोलीस स्टेशनला आणून प्रभारी अधिका-यांपुढे हजर केले. त्याच्याकडे आधिक चौकशी केली असता अखेर त्याच्या संयमाचा बांध सुटला. त्याने आपला गुन्हा कबुल करत विजयचा खून केल्याचे कबुल केले. याप्रकरणी विलास बाबू सरगर (रा. कवलापूर), उत्तम महादेव मदने (रा. डेरवली राम मंदिराजवळ, उरण, पनवेल, मूळ रा. कराडवाडी, ता. सांगोला), प्रकाश गोरख कोळेकर, संतोष विठ्ठल पांढरे, वैभव तानाजी आलदर (सर्व रा. कराडवाडी, कोळा, ता. सांगोला) या सर्व संशयीतांना अटक करण्यात आली. या घटनेत स्वतः पोलीस फिर्यादी होत विजय विलास सरगर याच्या खून प्रकरणी भा.दं.वि. कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पो. नि. सुहास जगताप करत आहेत. मुलाच्या त्रासाला वैतागून बापानेच त्याचा सुपारी देऊन खून केल्याचे तपासात उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here