बनावट फेसबुक खात्याद्वारे तरुणीचा नंबर केला व्हायरल!– पोलिसांच्या तावडीत सापडता ऋषीकेशची उडाली धांदल

औरंगाबाद : एका कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित असलेल्या तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम जडले. त्यामुळे त्याने तिच्याशी बोलण्याचा हट्टच धरला. मात्र तरुणी देखील जिद्दी होती. तिने त्याच्याशी बोलण्याचा नकार कायम ठेवला. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. तिचे बनावट फेसबुक खाते त्याने तयार केले. त्या बनावट खात्यावर त्याने तरुणीचा मोबाईल क्रमांक व्हायरल आणि अश्लिल फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने अनेक मुलांसोबत चॅटींग सुरु केली. तरुणी आपल्यासोबत चॅट करत असल्याचे बघून अनेकांनी त्याला प्रतिसाद देखील दिला.

ऋषिकेश अनिल वायखिंडे (23) रा. दौंड जिल्हा पुणे असे या तरुणाचे नाव आहे. एमएसस्सी पर्यंत शिक्षण झालेला ऋषिकेशने एका कार्यक्रमात हजेरी लावली असता त्याच्या नजरेच्या टप्प्यात ती तरुणी आली. तिला बघून नजरेच्या पहिल्याच टप्प्यात तो घायाळ झाला व तिचा दिवाना देखील झाला. तिच्याशी बोलण्यासाठी त्याने विविध मार्गाने फिल्डींग लावली. मात्र त्यात त्याला अपयश आले. तिचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात मात्र त्याला यश आले.

तिचा मोबाईल क्रमांक मिळताच ऋषिकेशच्या मनाची कळी खुलली. एमएससी झालेल्या ऋषिकेशने तिच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले. त्या बनावट खात्यावर त्याने विविध महिलांचे अश्लिल फोटो अपलोड करण्याचा सपाटाच लावला. विविध मुलांसोबत त्याने त्या बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून चॅटींग सुरु केले. आपल्यासोबत तरुणी बोलत असल्याचे भासल्याने अनेक आंबटशौकीन तरुणांनी देखील या चॅटींगला सुरुवात केली. त्या तरुणीचा मोबाईल क्रमांक देखील ऋषिकेशने जाहिर केला. या प्रकाराची माहिती त्या तरुणीला मिळताच त्ला धक्का बसला. तिला प्रचंड मानसिक त्रास सुरु झाला. तिने ग्रामीण सायबर पोलिसांकडे धाव घेत तपास करण्याची विनंती केली.

एका महिन्यात सायबर पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत ऋषिकेश अनिल वायखिंडे (दौंड, जि. पुणे) या अवघ्या तेवीस वर्षाच्या तरुणाला जेरबंद केले. ज्या वयात शिक्षण घेऊन भविष्याची वाटचाल करायची त्या वयात त्याला पोलिस कोठडीला सामोरे जाण्याची वेळ आली. ऋषिकेश याने त्या तरुणीचा मोबाईल क्रमांक नातेवाइकांकडून मिळवला होता. त्या क्रमांकावर त्याने सुरुवातीला तिला मेसेज पाठवणे सुरु केले. मात्र तिने त्याला देखील प्रतिसाद दिला नाही. तरीदेखील ऋषिकेशने तिला मेसेज पाठवत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. अनोळखी क्रमांकावरुन तिला व्हिडीओ कॉल व मेसेजेस येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तिने हा प्रकार घरी कथन केला. आपल्याच फेसबुक खात्यावरुन हा मोबाईल क्रमांक इतरांना मिळाला असल्याचे तिला समजले. त्यानंतर मात्र तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने थेट पोलिसात धाव घेत आपबीती कथन केली.

ग्रामीण सायबर पोलिसांकडे आल्यावर तिने अनोळखी व्यक्तीविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला. तिचे बनावट फेसबुक खाते तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी देखील  बनावट होता. सायबर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने ऋषिकेशचे नाव पुढे आले. हा सर्व प्रकार दौंड येथून ऑपरेट होत असल्याचे उघड झाले. सरकारी नोकराचा मुलगा असलेला ऋषिकेश हा एमएससी झालेला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस  पथक त्याच्या घरी गेले. तो घरी नसल्यामुळे आपण ऋषिकेशचे मित्र असल्याचे पोलिसांनी सांगत त्याच्या घरी ठाण मांडले. तो घरी येताच पोलिस पथकाने त्याला आपली खरी ओळख सांगत त्याच्याकडून गुन्हा वदवला. त्याने गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कैलास कामठे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाय, लखन पचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, रुपाली ढोले आदींच्या पथकाने सदर कारवाईला मुर्त स्वरुप देण्यात आले. तरुणीचे बनावट फेसबुक खाते तयार करतांना ऋषिकेशने डिपीसाठी सदर तरुणीचा खरा फोटो वापरला होता. तिच्या मुळ फेसबुक खात्यावरुन त्याने तो फोटो स्क्रिनशॉटच्या मदतीने घेतल्याचे तपासात उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here