दोघा पाईपचोरांना अटक

जळगाव : शेतक-याने शेतात ठेवलेले 35 पीव्हीसी पाईप चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. प्रशांत पंडीतराव साबळे (सुप्रिम कॉलनी जळगाव) आणि देवीदास प्रकाश घुले (रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील जफरोद्दीन रहिमोद्दीन पिरजादे या वयोवृद्ध शेतक-याची सुप्रीम कंपनीच्या बाजूला सुमारे दहा एकर शेती आहे. या शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी पीव्हीसी पाईपाचे 35 नग आणले होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांना ते पाईप शेतातून चोरी झाल्याचे आढळले. तिस हजार रुपये किमतीचे पाईप चोरीला गेल्यामुळे शेतकरी जफरोद्दीन पिरजादे हवालदिल झाले. पिकांना पाणी देण्यासाठी आणलेले पाईपच चोरीला गेल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होणार होते.

अखेर शेतमालक पिरजादे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत आपली व्यथा ठाणे अंमलदाराकडे कथन केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रितसर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, मुकेश पाटील, सतिष गर्जे आदींनी चोरट्यांचा मागोवा घेत चोरीचा शोध लावला.

प्रशांत पंडितराव साबळे (सुप्रीम कॉलनी जळगाव) व देविदास प्रकाश घुले (रामेश्वर कॉलनी जळगाव) या दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी पाईप चोरीचा गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली. शेतीला लागणा-या अत्यावश्यक वस्तूची चोरी झाल्यामुळे तातडीने लक्ष घालत पोलिस पथकाने गुन्हा उघडकीस आणला. अटकेतील प्रशांतवर यापूर्वी चोरीसह जबरी चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here