अर्चना अन् विलासचा रोमांस सुरु होता जोमात गळा आवळल्याने संदीप गेला कायमचा कोमात

नाशिक :  अर्चना आणि विलास यशवंत जगताप हे दोघे महाविद्यालयीन मित्र होते. दोघेही मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ या गावचे रहिवासी होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. त्या संपर्कातून दोघांची मैत्री झाली. बघता बघता दोघांची वैचारीक पातळी केव्हा समान झाली हे त्यांना समजलेच नाही. त्यामुळे दोघांच्या मनाच्या तारा जुळण्यास वेळ लागला नाही. अर्चनाला कोणते खाद्यपदार्थ आवडतात आणि ती रुसली म्हणजे तिचा ऑफ झालेला मुड कसा ऑन करायचा याची कला विलासने आत्मसात केली होती. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात केव्हा पडले हे त्यांना समजलेच नाही.
अर्चना व विलास या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघे आता मित्र नसून एकमेकांचे प्रेमी झाले होते. दोघांचा रोमांस बघता बघता फुल्ल फॉर्मात आला होता. दोघांच्या रोमांसचा सिलसिला जोरात सुरु झाला होता. दोघांची प्रेम कहानी सा-या महाविद्यालयात एक चर्चेचा विषय झाला होता. दोघे जणू काही लैला मजनू प्रमाणे महाविद्यालयात वावरत होते. गावात भेटतांना मात्र दोघे लपुनछ्पूनच एकमेकांना भेटत होते. दोघे चोरी चोरी चुपके चुपके सिनेमा बघण्यासाठी देखील जात होते. सिनेमा सुरु झाल्यानंतर झालेल्या अंधारात दोघांना मनमोकळा सहवास आणि एकांत मिळत होता. त्या एकांताचा दोघे प्रेमी पुरेपुर फायदा घेत होते. प्राथमीक स्वरुपात दोघे एकमेकांचा हात आपल्या हातात घेत होते. त्यानंतर मात्र त्यांचे धाडस वाढत होते. सिनेमाच्या अंधारात दोघांना एकमेकांचा स्पर्श झाला म्हणजे त्यांच्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण झपाट्याने वाढत असे. त्यातून दोघे एकमेकांच्या खुप जवळ येत होते. अशा प्रकारे दोघा प्रेमीजणांनी आपल्या प्रेमाचा एक मोठा टप्पा पार केला होता.
बघता बघता दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाले. साहजिकच त्यामुळे दोघांचे महाविद्यालयीन जिवन संपुष्टात आले. दोघांची दररोज होणारी भेट कमी कमी होत गेली. दरम्यानच्या काळात विलास आपल्या उद्योगधंद्याला लागला. त्यामुळे त्याच्या आईवडीलांनी त्याच्या लग्नाची तयारी चालवली होती. त्याच्या आईवडीलांनी पसंत केलेल्या स्थळाला तो नकार देवू शकला नाही. काही दिवसांनी त्याचे एका तरुणीसोबत लग्न झाले. लग्नानंतर तो नाशिक – सिडको येथील उत्तम नगर भागात राहण्यास आला. असे असले तरी त्याचे मनोमन अर्चनावर प्रेम कायम होते.
दरम्यानच्या काळात अर्चनाचे लग्न लवकरात लवकर उरकण्यासाठी तिचे आईवडील वायुवेगाने कामाला लागले होते. तिच्यासाठी वरसंशोधनाची मोहिम त्यांनी युद्ध पातळीवर राबवली. त्यात त्यांना यश आले. मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील संदिप नाना खैरनार याचे स्थळ त्यांना योग्य वाटले. संदिप खैरनार हा तरुण पेट्रोल पंपावर कामाला जात असे. वास्तविक अर्चना तिचा प्रेमी विलास यास विसरू शकत नव्हती. परंतू आईवडीलांपुढे तिचे काही एक चालले नाही. तिने संदिप खैरनार या युवकासोबत लग्न करण्यास होकार दिला.
समाजाच्या चालीरीतीनुसार अर्चनाचे लग्न मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील संदिप खैरनार या युवकासोबत झाले. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील माहेरवाशीन अर्चना माप ओलांडून टाकळी या गावी पतीसोबत संसार करण्यासाठी आली. लग्नानंतर तिला कित्येक दिवस पुर्वाश्रमीचा प्रेमी, विलासची आठवण येत होती. परंतू काही दिवसांनी ती आपल्या संसारात रममान झाली.
काही महिन्यांनी एक दुर्दैवी घटना घडली. विलास जगताप याच्या पत्नीचे अकाली निधन झाले. पत्नीचे निधन झाल्यामुळे विलास एकाकी झाला होता. त्याचा दिवस कसाबसा निघून जात होता. परंतू रात्र त्याला खायला उठत असे. रात्री तो एका कुशीवरुन दुस-या कुशीवर कसाबसा तळमळत असे. प्रेमी विलासच्या पत्नीचे निधन झाल्याची बातमी अर्चनाला देखील समजली. काही दिवसांनी दोघांची एका ठिकाणी अचानक भेट झाली. त्यावेळी दोघांनी आपल्या महाविद्यालयीन  आठवणी ताज्या केल्या. या भेटीत पुन्हा दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलला. दोघांनी आपला हात एकमेकांच्या हातात घेतला. त्या स्पर्शाने दोघे प्रेमी पुन्हा रोमांचीत झाले. बराच वेळ गुजगोष्टी केल्यानंतर दोघे आपापल्या घरी निघून गेले.
त्या रात्री दोघांना अजिबात झोप लागली नाही. अर्चनाचा पती संदिप कित्येकदा रात्रपाळी करण्यासाठी पेट्रोल पंपावर कामाला जात असे. त्यामुळे ती देखील बिछान्यावर कित्येकदा तळमळ्त असे. त्या दिवशी भेट झाल्यानंतर दोघा प्रेमींची अवस्था सारखीच होती. दोघांना त्या रात्री झोपच लागली नाही. इकडे पत्नीचे निधन झाल्यामुळे विलास एकटाच बिछान्यावर तळमळ्त होता. दुसरीकडे अर्चनाचा पती रात्रपाळीसाठी पेट्रोल पंपावर गेल्याने ती देखील एकटीच बिछान्यावर तळमळ्त होती. विलासच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यानंतर दोघांचे प्रेम पुन्हा एकवेळ उफाळून आले. समुद्राच्या लाटेप्रमाणे दोघांच्या प्रेमाला भरती आली होती. त्यांना पुन्हा तेच महाविद्यालयीन दिवस आठवले होते.
विलासने एक नविन मोबाईल हॅंड्सेट व सिम घेवून ते अर्चनाला वापरण्यास दिले. त्या सिमवर दोघे एकमेकांसोबत बराच वेळ बोलू लागले. अर्चनाचा पती, संदिप रात्री पेट्रोल पंपावर गेला म्हणजे ती विलास यास फोन करुन बोलावून घेवू लागली. संदिप पेट्रोल पंपावर गेला म्हणजे विलास लागलीच तिच्या भेटीला येवू लागला. संदिपच्या गैरहजेरीत दोघांना जवळ येण्याची जणू काही चटकच लागली. अशा प्रकारे दोघे प्रेमी एकमेकांच्या खुप जवळ आले. हा प्रकार जवळपास नऊ महिने अव्याहतपणे सुरुच होता. या नऊ महिन्यात दोघांनी प्रेमाचा एक मोठा टप्पा गाठला होता.
२८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे अर्चनाचा पती, संदिप पेट्रोल पंपावर कामाला गेला. तो बाहेर जाताच अर्चनाने प्रेमी विलासच्या मोबाइलवर संपर्क साधला. दोघात बोलणे झाल्यानंतर विलासने रात्रीचे जेवण तिच्यासोबतच करण्याचा आग्रह धरला. तिने देखील त्याला आपल्या हातचे रुचकर जेवण करण्यासाठी आपल्या घरी बोलावून घेतले. जेवणासह गुजगोष्टी व इतर कार्यक्रम करण्याचा दोघांनी बेत केला होता. ठरल्यानुसार रात्री विलास जगताप तिच्या घरी आला. त्यावेळी सुरुवातीला दोघांनी एकमेकांना आपल्या कवेत घेतले. त्यानंतर अर्चना स्वयंपाक करण्यासाठी गेली. ती स्वयंपाक करत असतांना विलास सोबत गुलुगुलू गप्पा करत होती.
स्वयंपाक सुरु असतांना दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्यावेळी अचानक दारावरची बेल वाजली. दार उघडताच समोर दोघांना साक्षात संदिप दिसला. परपुरुष विलास आपल्या घरात व तो देखील रात्रीचे वेळी दिसताच संदिपची नस तडकली. त्याने आपला मोर्चा पत्नी अर्चनाकडे वळवला. ती प्रेमी विला साठी सुग्रास भोजन तयार करत असल्याचे बघून त्याचे डोके अजूनच भडकले. त्याने तिच्यासह विलासला शिवीगाळ सुरु केली. बोलता बोलता त्याचा राग मोठ्या प्रमाणात उफाळ्ल्याने त्याने थेट अर्चनाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
आता आपली प्रेमकथा बाहेर जगजाहीर होईल अशी भिती दोघांना वाटू लागली. शिवाय आता संतापलेला संदिप आपल्याला ठोकून काढेल अशी भिती वाटल्याने दोघे गर्भगळीत झाले. त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी दोघांनी मिळून पुर्ण ताकदीनिशी त्याला पलंगावर ओढून आणले. संदिप पलंगावर कोसळताच अर्चना त्याच्या पोटावर बसली व तिने त्याचे दोन्ही हात घट्ट धरुन ठेवले. दरम्यान विलासने नॉयलॉनच्या दोरीने संदिपचा गळा आवळण्यास सुरुवात केली. नॉयलॉनच्या दोरीचा फास घट्ट होत गेल्याने संदीपच्या जिवाची तडफड सुरु होती. तो त्याचे हातपाय झाडत होता. अखेर संदिपने आपला जिव कायमचा सोडला.
आता संदीपच्या मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न दोघांना पडला. थंडीचा मौसम असल्याने परिसरातील लोकांनी आपली दारे खिडक्या लावून घेतल्या होत्या. कुणाला या घटनेची कानोकान खबर लागली नव्हती. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी अजून रात्र होवू दिली. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सर्वत्र सामसूम झाल्यानंतर विलासने संदिपचा मृतदेह मोटार सायकलवर ठेवून दोरीने बांधला. हा मृतदेह कुठेतरी सुनसान जागी टाकून देण्याचे त्याने ठरवले. त्यानुसार त्याने संदिपचा मृतदेह मोटर सायकलने मुंबई – आग्रा महामार्गावर टाकळी शिवारात आणला. महामार्गावर कुणीही आपल्याला बघत नसल्याची त्याने खात्री करुन घेतली. टाकळी शिवारातील फाट्याजवळ एका काटेरी झुडूपात कुणाला दिसणार नाही अशा रितीने त्याने संदिपचा मृतदेह फेकून देत तेथून पोबारा केला.
काम फत्ते झाल्याचे समजताच रात्री दोन वाजता अर्चनाने आपल्या आईवडीलांसह नातेवाईकांना फोन करुन सांगीतले की माझे पती काल सायंकाळ पासून पेट्रोल पंपावर गेले आहेत. अजून देखील ते घरी परत आलेले नाहीत. मला त्यांची चिंता लागली आहे. अशा प्रकारे रातोरात खोटी माहीती पसरवून तीने सर्वांची दिशाभूल करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
दुस-या दिवशी २९ डिसेंबर रोजी सकाळी संदिपचा मृतदेह रस्त्याने जाणा-या एका दुध विक्रेत्याच्या नजरेस पडला. त्याने या मृतदेहाची गावक-यांना माहीती दिली. बघता बघता या मृतदेहाची खबर वा-यासारखी पसरण्यास वेळ लागला नाही.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान या घटनेची माहीती नाशिक ग्रामीण पोलिस प्रशासनाला मिळाली. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग व अप्पर पोलिस अधिक्षक संदिप घुगे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांच्यासह पथकाला घटनास्थळी पाचारण केले. सर्वांच्या दृष्टीने सुरुवातीला हा मृतदेह अनोळखी होता. स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांनी घटनास्थळासह मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. मृतदेहाच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा स्प्ष्ट दिसत होत्या.
स्थानीक बातमीदारांकडून तसेच गावक-यांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. सदर अनोळखी मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी संदिप नाना खैरनार याचा असल्याची माहीती मिळाली. मयत संदिप खैरनार हा पेट्रोल पंपावर कामाला असल्याची देखील माहीती समोर आली. मयताची ओळख पटल्याने जवळपास निम्मा तपास झाला होता. आता या गुन्हयातील मारेकरी कोण व त्यांनी हा खून का केला? हा मुख्य तपास बाकी होता. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.317/2019 भा.द.वि.302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के. पाटील यांनी या गुन्हयाचा समांतर तपास आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.
या प्रकरणी खब-यांचे नेटवर्क वापरुन टाकळी गावात जावून परिसर पिंजून माहीती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक आठवडा उलटला तरी या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता. हा खून अनैतीक संबधातून झाला असावा असा पोलिसांचा संशय बळावला. त्या दृष्टीने पुढील तपास सुरु करण्यात आला. त्या अनुषंगाने तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली.
शेवटी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मयत संदीप नाना खैरनार याची पत्नी, अर्चनाचे माहेर असलेल्या चिखलओहोळ या गावातील विलास यशवंत जगताप या तरुणासोबत लग्नाच्या पुर्वीपासून  प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली. या दोघांचे महाविद्यालयात प्रेम निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार ७ जानेवारी रोजी मयत संदिपची पत्नी अर्चना हिला तिच्या नातेवाईकांसह चौकशीकामी बोलावण्यात आले. तिची चौकशी करण्याकामी महिला पोलिस कर्मचा-यांची मदत घेण्यात आली.
कधी गोडीगुलाबीने तर कधी पोलिसी खाक्या दाखवून, मधेच सहानुभूती दाखवून शिताफीने महिला पोलिसांच्या मदतीने अर्चनाला बोलते करण्यात यश आले. महाविद्यालयीन काळापासून गावातील विलास यशवंत जगताप याच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचे तिने कबुल केले. या प्रेमसंबंधातून दोघांचे अनैतीक संबंध असल्याचे देखील तिने कबुल केले. केवळ लग्नानंतर आपण वेगळे झाले होतो. परंतु विलासच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याच्यासोबत प्रेमसंबंध पुन्हा सुरु झाले असे तिने कबुल केले. आपण दोघांनी मिळून पती संदिपचा खून केल्याचे तिने स्पष्ट केले.
तिने दिलेल्या माहीतीनुसार विलास यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याची व अर्चनाची नजरानजर होणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात आली. त्याला या गुन्हयाकामी विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तरीदेखील त्याला गोडीगुलाबीने विश्वासात घेवून विचारपूस करण्यात आली. तरी देखील त्याने मला काहीच माहीत नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे  सुरुच ठेवली. आम्हाला अर्चनाने सर्व काही सांगीतले आहे असे त्याला सांगण्यात आले. अखेर त्याच्या समोर अर्चनाला उभे करण्यात आले. तेव्हा त्याचा चेहरा खाली पडला. त्यानंतर अर्चनाला वेगळ्या खोलीत नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल करत सर्व घटनाक्रम कबुल केला.
अर्चना व विलास या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नरेंद्र भदाने यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघा संशयीत आरोपीतांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना सुरुवातीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. के. पाटील व त्यांचे सहकारी स.पो. नि. संदीप दुनगहु, सपोनि स्वप्निल राजपुत, सपोनि सुनिल अहिरे, पो.हवालदार वसंत महाले, रविंद्र वानखेडे, दिपक अहिरे, पोलिस नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीष आव्हाड, संदीप हांडगे, अमोल घुगे, पो.कॉ. रतिलाल वाघ, फिरोज पठाण, गिरीश बागुल, प्रदिप बहिरम तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, पोलीस हवालदार नारायणसिंग राजपुत, पोलिस नाईक शैलेश बच्छाव , शरद मोगल, महिला कर्मचारी दिपाली बच्छाव अशा पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here