तृतीयपंथी वरचढ, दुचाकीस्वाराला करतात मारझोड! – खूनाच्या तपासात एलसीबीची बारा तासात घोडदौड!!

अहमदनगर : अश्लिल हातवारे करत लोकांकडून जबरीने पैसे लाटण्याचा आपला हक्कच असल्याच्या अविर्भावात तृतीयपंथी टोळ्या वागत असतात. धावत्या रेल्वेत तृतीयपंथी टोळ्या थेट प्रवाशांच्या खिशात हात घालून पैसे काढत असतात. आपलाच माल समजून तृतीयपंथी बाजारातील भाजीपाला थेट पिशवीत घालतात. आपले गोरे अंग दाखवून रेल्वे प्रवाशांसोबत अश्लिल बोलून व लगट करत प्रसंगी मारहाण करुन पैसे जमा करतात. मात्र त्यांना देखील कधीतरी कुणीतरी एखादा वरचढ भेटतो. त्यावेळी हेच गुंडगिरी करणारे तृतीयपंथी सुतासारखे सरळ होतात. पैसे दिले नाही म्हणून वाहनधारकाला जिव जाईपर्यंत तृतीयपंथी टोळीने दांडक्याने मारहाण केली. या टोळीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ताब्यात घेत काही दिवसांपुर्वी अटक केली.

अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील एकरुखे गावात दिलीप आभाळे रहात होते. 5 सप्टेबरची सकाळ उजाडली मात्र ती पहाट त्यांच्यासाठी अखेरची होती. या दिवशी ते आपल्या मित्रासह गणेशनगर परिसरातील पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले. पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना वाटेत काही तृतीयपंथीयांनी त्यांना अडवले. सकाळी सकाळी अश्लिल हातवारे करत त्यांनी दिलीप आभाळे यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. सकाळीच तृतीयपंथी टोळीचे दर्शन झाल्याने दिलीप आभाळे मनातून नाराज झाले. तृतीयपंथी टोळीला पैसे देण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी या टोळक्याला बाजुला होण्यास सांगीतले. मात्र पैसे घेण्याच्या हट्टाला तृतीयपंथी पेटले. त्यातच पैसे द्यायचे नाही यासाठी दिलीप आभाळे हट्टाला पेटले होते. त्यातून दोघांमधे वाद सुरु झाले. या टोळीच्या तावडीतून कसेबसे बाहेर येत त्यांनी गाडीत पेट्रोल भरुन पुढील कामाला सुरुवात केली. मात्र तृतीयपंथीयांच्या मनात दिलीप आभाळे यांच्याविषयी राग निर्माण झाला होता.

तो राग मनात ठेवत तृतीयपंथीयांनी या घटनेची माहिती आपल्या इतर साथीदारांना दिली. पैसे मागणे व न दिल्यास बळजबरी घेणे हा आपला हक्कच असल्याच्या अविर्भावात सर्व तृतीयपंथी एकत्र आले. त्यांनी त्याच दिवशी एकरुखे गावात जावून दिलीप आभाळे यांना गाठले. आठ ते नऊ जणांच्या टोळीने दिलीप आभाळे यांना दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. या बेदम मारहाणीत दिलीप आभाळे जबर जखमी झाले. या बेदम मारहाणीनंतर सर्व तृतीयपंथी पसार झाले. मात्र जबर जखमी झालेले दिलीप आभाळे जागेवरच विव्हळत होते.

दिलीप आभाळे यांना मारहाण झाल्याचे समजताच त्यांचे परिजन व परिचीत तेथे जमा झाले. त्यांनी आभाळे यांना तातडीने रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले. तब्बल आठ दिवस दिलीप आभाळे यांनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. अखेर 16 सप्टेबर रोजी त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज संपली. मृत्यूने त्यांच्यावर विजय मिळवला. दिलीप आभाळे हे जग सोडून इहलोकी निघून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा महेश आभाळे याने राहता पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा गु.र.न. 1251/21 भा.द.वि. 302, 143, 147, 148, 149 नुसार आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार रा. श्रीरामपूर व त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आला. 

पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्याकडे सोपवला. पो.नि.अनिल कटके यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या तपासाला गती दिली. गुन्ह्याचे घटनास्थळ असलेल्या राहता तालुक्यातील राहता या गावी पथकाने भेट देत आरोपींची माहिती घेत त्यांचा माग काढला.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार सोपान गोरे, मन्सूर सय्यद, पो.हे.कॉ. भाऊसाहेब काळे, विजयकुमार बेठेकर, मनोहर गोसावी, पोलिस नाईक शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पो.कॉ. विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, चालक पो.हे.कॉ. संभाजी कोतकर आदींनी गोपनीय माहिती संकलीत केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीतांचा शोध घेत सुरुवातीला आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (26) रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर यास ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबुल करत आपल्या इतर साथीदारांची नावे आणि त्यांचा ठावठिकाणा सांगितला. त्याने दिलेली माहिती व तांत्रीक विश्लेषणाचा आधार घेत इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात पथकाला यश आले. क्रमाक्रमाने विकास दशरथ धनवडे उर्फ रुपाली सलोनी शेख (25), रा. सदर, आनंद फौजी शेलार उर्फ रुचीरा सलोनी शेख (20) रा. सदर, लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख (20) इंदीरानगर, कोपरगाव, अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार (23) खंडाळा ता. श्रीरामपूर, गौरव उर्फ सनी भागवत पवार (19) खंडाळा ता. श्रीरामपूर, राहूल उत्तम सोनकांबळे (22) खंडाळा, ता. श्रीरामपूर, अरबाज सत्तार शेख (19) खंडाळा ता. श्रीरामपूर या सर्वाना खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार अशा विविध ठिकाणांहून ताब्यात घेत अटक करण्यात आली. यातील इरफान रज्जाक शेख रा. खंडाळा श्रीरामपूर हा मात्र फरार होता.  अटकेतील सर्वांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना राहता पोलिस स्टेशनला पुढील तपासकामी हजर करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here