बाळूमामाचा साक्षात्कार सांगून सुरु होती लुटमारी!- पोलिस कोठडीत संपली मनोहरमामाची दुकानदारी!!

सोलापूर : मनोहर भोसले बोलण्यात पटाईत होता. डि.एड.पर्यंत शिक्षण घेतलेला मनोहर भोसले याला कुठेही नोकरी मिळाली नाही. नंतर त्याने नोकरीसाठी प्रयत्न देखील केला नाही. सुरुवातीच्या काळात त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. करमाळा परिसरातील लहान मोठ्या गावात भाजीपाला विकून मनोहर भोसले आपला चरितार्थ चालवू लागला. मात्र या व्यवसायात त्याचे मन काही रमले नाही. मन रमले नाही म्हणून या व्यवसायात त्याचा जम बसला नाही. कमी श्रमात आणि कमी कालावधीत अधिकाधिक पैसे कसे मिळतील याचा आराखडा मनोहर भोसले याने मनाशी बांधण्यास सुरुवात केली.

बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे त्याने एके दिवशी जाहीर केले. “बाळूमामाच्या नावाने चांगभल” या नावाने कलर्स मराठी या चॅनलवर सुरु असलेल्या मालिकेचे सुमारे आठशे भाग प्रसारीत झाल्यामुळे बाळूमामाच्या नावाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली होती. त्याच बाळूमामाच्या नावाचा वापर मनोहर भोसले याने सुरु केला. आपल्याला बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे सांगून त्याने लोकांना आपल्याकडे आकर्षित केले. लवकरच मनोहर भोसले याचे नामकरण मनोहरमामा असे झाले.

कांबळे वस्ती जावून तो लोकांचे भविष्य सांगू लागला. मात्र तेथील लोकांशी त्याचे मतभेद झाले. त्यामुळे त्याने एका मठाचा आसरा घेतला. त्या मठात जावून कथित मनोहरमामा लोकांना भविष्य सांगू लागला. अमावस्येच्या रात्री आपल्याला बाळूमामांचा साक्षात्कार झाल्याचे तो तेथील लोकांना सांगू लागला. ग्रामीण भागातील काही अंधश्रद्धा बाळगणा-या व जोपासणाया लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने लोकांना एके ठिकाणी खड्डा खोदण्यास सांगितला. खड्डा खोदला असता त्याजागी भंडारा व खोबरे निघाले. या गोष्टीची गाव परिसरात चर्चा होण्यास वेळ लागला नाही. अंधश्रद्धा बाळगणा-या लोकांनी मनोहर भोसले यास मनोहरमामा म्हणत डोक्यावर घेतले. त्याच्या भेटीला उंदरगाव, मांजरगाव, उमवड, राजुरी, वाशिंबे, पोथवाडी येथील लोक जमा झाले. अशा प्रकारे लोक त्याला मनोहर मामा म्हणू लागले.

काही दिवसांनी या मनोहरमामाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गिरीम येथे बुवाबाजीचा उद्योग सुरु केला. मात्र पुणे जिल्ह्यात त्याची बुवाबाजी जास्त दिवस तग धरु शकली नाही. या ठिकाणी त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्याने बारामती तालुक्यातील गोजुबाबी येथे आपले दुकान हलवले. मात्र येथे देखील त्याची बुवाबाजीची दुकानदारी निट चालली नाही.

अखेर बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे म्हणणा-या मनोहरमामाने पुन्हा आपली बुवाबाजीची दुकानदारी उंदरगावला आणली. याठिकाणी त्याने मठात कामकाज सुरु केले. याठिकाणी त्याने आपल्या आईवडीलांना मदतीला घेतले. मामांना ओवाळणी टाका असे ते भविष्य बघण्यास आलेल्या  लोकांना हळूच सांगू लागले. त्यामुळे कमाल शंभर रुपयांपर्यंत लोक ताटात ओवाळणी टाकू लागले. हळूहळू उंदरगावासह परिसरातील लोक बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे म्हणवणा-या मनोहरमामाकडे गर्दी करु लागले. बघता बघता मनोहरमामाचे एक वलय निर्माण झाले. त्याच्याकडे बडे बडे अधिकारी हजेरी देवू लागले. त्यांच्या माध्यमातून मनोहरमामाची चांगली कमाई होण्यास मदत झाली. या कमाईच्या माध्यमातून मनोहरमामाने एक चांगला मठ बांधला. त्या मठात प्रत्येक अमावस्येला मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.  सोबतच “कलर्स टिव्ही” या चॅनलवर बाळूमामाच्या नावाने चांगभल ही सुरु असलेली मालिका बाळूमामाची प्रसिद्धी करत होती. त्याच बाळूमामाचा साक्षात्कार झाल्याचे सांगून मनोहरमामा आपले भले करुन घेत होता. 

गुळ व साखरेच्या अवतीभोवती ज्याप्रमाणे मुंग्या घिरट्या घालतात त्याप्रमाणे मनोहरमामाच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी तयार झालेले त्याचे दोन समर्थक शिष्य घिरट्या घालू लागले. विशाल वाघमारे व ओंकार शिंदे अशी त्यांची नावे आहेत. कधी काळी गॅस सिलेंडरची घरोघरी वाहतुक करणा-या विशाल वाघमारे याने आपले नाव नाथबाबा असे तयार केले. तो सोलापुर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील मुळ रहिवासी आहे. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्या ओंकार शिंदे याने नोकरी मिळाली नाही म्हणून मनोहरमामाचे शिष्यत्व पत्करुन पैसे कमावण्यास सुरुवात केली होती.

आलेल्या भक्तगणांकडून या दोघा तथाकथीत शिष्यांनी देणग्या घेण्याचे काम सुरु केले होते. देणगी घेतांनाच ते देणगीदारांचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक देखील घेऊ लागले. आधार क्रमांकासह सोशल मिडीयाच्या मदतीने हे दोघे शिष्य संबंधित देणगीदाराची कौटूंबिक माहिती जमा करु लागले. ती माहिती मनोहरमामाकडे जाऊ लागली. संबंधीत भक्ताच्या घरात किती लोक आहेत व त्यांची नावे काय आहेत याची कुंडली मनोहरमामा आलेल्या भक्ताला स्वत:हून सांगत असे. आपल्या घरातील लोकांची संख्या व त्यांची नावे मनोहरमामाला कशी काय समजली हे आलेल्या भक्ताला समजत नव्हते. मनोहरमामा म्हणजे जणूकाही अंतर्यामी आणि दैवीशक्ती असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण होण्यास वेळ लागला नाही. वास्तविक मनोहरमामाचे दोघे भक्त आधारकार्डासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचा डाटा आपल्याकडे जमा करत होते. त्या माहितीच्या आधारे ते लोकांची दिशाभुल करत होते. अशा प्रकारे मनोहरमामासह त्याचे दोघे शिष्य अंधभक्तांची लुटमार करत होते. तिघे रहात असलेल्या मठास ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसतांना विज कनेक्शन देखील बेकायदा घेतले होते. विज कंपनीने ते कनेक्शन नंतर कट केले होते.

जून 2019 मधे एक महिला आपली कौटूंबिक समस्या घेऊन मनोहरमामाच्या मठात आली. बाळूमामाचा साक्षात्कार झालेला मनोहरमामा आपल्या भक्तांवरील संकटे नाहीसे करतो असे तिला कुणाकडून तरी समजले होते. त्या माहितीच्या आधारे ती मठात आली होती. नेहमीप्रमाणे विशाल वाघमारे (नाथबाबा) व ओंकार शिंदे या दोघा तथाकथीत शिष्यांसोबत अगोदर तिचा पाला पडला. दोघांनी वाट अडवत तिची सखोल विचारपूस केली. घरात पैशांची कमतरता व प्रापंचिक अडचण असल्याचे कारण तिने दोघांजवळ कथन केले. पैशांची कमतरता असल्यामुळे पतीसोबत आपले भांडण झाले असून तोडगा काढण्यासाठी मठात आल्याचे तिने दोघांजवळ कथन केले.  मनोहरमामाला भेटण्यासाठी पाच हजार रुपये लागतील असे दोघांनी तिला म्हटले. तिने नाथबाबाला पाच हजार रुपये दिले व त्याची तिला पावती देखील देण्यात आली. तब्बल दोन तास प्रतिक्षा यादीवर थांबल्यानंतर तिची मनोहरमामासोबत भेट घडवून देण्यात आली.

मनोहरमामासोबत भेट घडल्यानंतर त्या महिलेने तिच्या प्रापंचिक अडचणी कथन केल्या. तुझ्या सर्व अडचणी दुर होतील मात्र त्यासाठी तुला पाच वा-या कराव्या लागतील असे मनोहरमामाने तिला म्हटले. पंटर रुपी शिष्य असलेल्या दोघांनी अगोदरच तिच्याकडून माहिती संकलित केली होती. त्या माहितीच्या आधारे मनोहरमामाने तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत काही लोकांची नावे होती. ती नावे त्या महिलेने वाचली. त्यानंतर मनोहरमामाने तिला म्हटले की बोल…… तुझे या लोकांसोबत अनैतिक संबंध आहेत की नाही? त्यावर त्या महिलेने म्हटले की नाही……. या लोकांसोबत माझे व्यावहारीक संबंध आहेत. तिचे उत्तर ऐकून मनोहरमामा तिच्यावर गरजला. मला बाळूमामाचा साक्षात्कार झला आहे. मला सर्व माहिती आहे. तु खोटे बोलू नको. ब-या बोलाने पाच वा-या कर तुझे कल्याण होईल. अशाप्रकारे संवाद घडल्यानंतर ती महिला मठाच्या बाहेर आली.

त्यानंतर ठरल्यानुसार दुसरी वारी करण्यासाठी अर्थात दुसरी भेट घेण्यासाठी ती महिला 2 जुलै 2019 रोजी पुन्हा मठात गेली. तिला अगोदर विशाल वाघमारे (नाथबाबा) याची भेट घ्यावी लागली. नाथबाबाने तिला म्हटले की तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विधी करावा लागणार आहे. त्या विधीसाठी पंधरा हजाराचा खर्च आहे. त्या महिलेने सोबत आणलेले पंधरा हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिला एका स्वतंत्र खोलीत बसवून ठेवण्यात आले. काळी बाहुली, काळे कापड, काळे तिळ व काही लिंबू असा ऐवज नाथबाबाने तिच्यासमोर आणून ठेवला. काहीतरी मंत्र पुटपुटत त्या सर्व वस्तूंचा स्पर्श त्या महिलेच्या अंगाला करुन ओवाळून कुठेतरी टाकून देण्यात आले. पुढील वारीला येतांना एवढीच रक्कम आणायची असे तिला सांगण्यात आले.

तिस-या वारीला अशाच प्रकारे त्या महिलेच्या अंगावरुन या वस्तूंचा उतारा करुन फेकून देण्यात आल्या. मात्र यावेळी नाथबाबाचा हात तिच्या सर्वांगावरुन फिरत होता. त्या महिलेला या प्रकाराची लाज वाटत असली तरी विधी समजून तिने हा प्रकार सहन केला.

चौथ्या वारीच्या वेळी 28 सप्टेबर 2019 रोजी मठातील एका सहका-याने ग्लासात दुध व पेढे त्या महिलेला आणून दिले व खाण्यास सांगितले. तिने ते दूध प्राशन करत पेढे मुकाटपणे खाल्ले. त्यानंतर काही वेळाने मनोहरमामा तिच्याजवळ आला. तो तिला म्हणाला की तु खुप सुंदर आहेस. तुझ्या सुंदरतेचा वापर करुन मला समाधानी अर्थात खुष कर. तुझे कल्याण होईल. सध्या टिव्हीवर सुरु असलेल्या “रात्रीस खेळ चाले” आणि “बाळूमामाच्या नावाने चांगभल” या दोन्ही मालिका माझ्याच पैशांवर सुरु आहेत. त्या मालिकांमधे तुला काम मिळवून देतो. एका भागासाठी तुला किमान पाच ते दहा हजार रुपये मानधन मिळेल. असे बोलता बोलता तो तिच्या सर्वांगावरुन हात फिरवू लागला. बघता बघता बोलता बोलता त्याने तिला आपल्याजवळ ओढून घेत तिच्या मनाविरुद्ध नको ते कृत्य केले. आपला कार्यभाग आटोपल्यानंतर त्याने  तिला म्हटले की सर्व नेते आणि अधिकारी माझ्या परिचयातील आहेत. कुणाला काही सांगितले तर तुझीच बदनामी होईल. मी बोलवेन तेव्हा यायचे आणि मला सुख द्यायचे.   

टिव्ही मालिकेत काम मिळवून देतो अशा भुलथापा देत 24 मार्च 2020 रोजी मनोहरमामाने तिला फोन करुन उंदरगाव येथे बोलावले. एका खोलीत थांबवत तिचे विविध अ‍ॅंगलमधे विविध पोजमधे फोटोसेशन करण्यात आले. फोटोसेशन झाल्यानंतर काही वेळाने तिच्याजवळ मनोहरमामा आला. यावेळी देखील त्याने तिच्या मनाविरुद्ध स्वत:चे सुख पुर्ण करुन घेतले. मनोहरमामा निघून गेल्यानंतर लागलीच काही वेळाने तिच्याजवळ नाथबाबा आला. तु मामासोबत जो प्रकार केला तो मला देखील करायचा आहे नाहीतर हा सर्व प्रकार मी तुझ्या घरी सांगेन अशी धमकी देत नाथबाबाने देखील तिच्याकडून सुख घेतले.

आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने अगोदर सोलापूर तालुका पोलिस स्टेशन गाठले. तेथे तिने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहरमामा, नाथबाबा व वैभव वाघ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा शुन्य  क्रमांकाने दाखल केल्यानंतर करमाळा पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.846/21 भा.द.वि. 354, 376 तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. योगायोगाने याच दिवशी मनोहरमामाविरुद्ध बारामती तालुका  पोलिस स्टेशनला फसवणूकीसह अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच दिवसात मनोहरमामाच्या विरोधात करमाळा आणि बारामती पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी मनोहरमामाची शोध मोहीम सुरु झाली.

10 सप्टेबर रोजी पुणे एलसीबी पथकाच्या गळाला मनोहरमामा लागला. सातारा जिल्ह्याच्या लोणंद तालुक्यातील सालपे येथील एका फार्म हाऊसवर असल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. बारामती ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. आठ दिवस बारामती पोलिसांच्या कोठडीची हवा घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी करमाळा पोलिस हजरच होते. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्याकामी करमाळा पोलिस स्टेशनचे पो.नि. सुर्यकांत कोकणे यांनी न्यायालयास विनंती केली.  न्यायालयाने ती विनंती मान्य केल्यानंतर मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात आला. 20 सप्टेबर रोजी करमाळा पोलिसांच्या पथकाने त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा संशयीत आरोपी मनोहरमामा याचे दोन्ही संशयीत साथीदार आरोपी फरार होते. या दोघा फरार आरोपींची कुणाला माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी माध्यमांना केले आहे. सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, डिवायएसपी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुर्यकांत कोकणे व त्यांचे सहकारी कर्मचारी हेडकॉन्स्टेबल विलास रणदिवे, सिद्धेश्वर लोंडे, संतोष देवकर, चंद्रकांत ढवळे, सोमनाथ जगताप, तौफिक काझी आदी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here