‘महात्मा गांधी आणि पोलीस’ – डॉ. मुंढे यांचे ऑनलाईन व्याख्यान

जळगाव दि. 30 (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे (गांधीतीर्थ) 2 ऑक्टोबर रोजी विश्व अहिंसा दिवस, चरखा जयंती तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या (153 व्या) आणि लालबहादूर शास्त्री यांच्या (118 व्या) जयंतीच्या औचित्याने विशेष ऑनलाईन कार्यक्रम आयोजला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये ‘महात्मा गांधी आणि पोलीस’ या विषयावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सुसंवाद साधतील. याच कार्यक्रमात गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सदर कार्यक्रम गांधीतीर्थच्या फेसबुक व युट्युब चॅनलवर थेट प्रक्षेपीत करण्याची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले आहे.

2 ऑक्टोबरला दरवर्षी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान ‘अहिंसा सद्भावना रॅली’ काढली जाते. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्व नियम पाळून मोजक्या संख्येने प्रातिनिधिक रॅली काढली जाणार आहे. महानगर पालिका ते गांधी उद्यान या दरम्यान ही रॅली होईल. त्यानंतर सकाळी 8.00 ते 9.30 दरम्यान होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार असतील. जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन उपस्थितांना अहिंसेची शपथ देतील. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील एकांकिका स्पर्धेत दोन्ही गटात विजेत्या ठरलेल्यांची नावे जाहीर होतील.
‘महात्मा गांधी आणि पोलीस’ डॉ. मुंढे यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान गांधीतीर्थ येथे विविध विषयांवर संशोधन होत असते. एकदा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गांधी तीर्थला भेट दिली असता महात्मा गांधीजी आणि पोलीस याबाबत काही नवीन, रोचक व अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध आहे का? याबाबत संशोधकांशी चर्चा केली. त्यांना त्या चर्चेतून सविस्तर माहिती मिळाली. ‘महात्मा गांधी आणि पोलीस’ या विषयावर आपण सखोल अभ्यास करू, संशोधन करू असा निश्चय पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी केला. त्याचा आरंभ म्हणून त्यांनी या विषयावर व्याख्यान देण्यास उत्सुकता दर्शविली त्यानुसार हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विषय पुढे आलेला आहे.

अखंड सूत कताई कार्यक्रम
महात्मा गांधीजींनी श्रम आणि एकतेला महत्त्व दिलेले आहे. चरख्यावर सूत कताई हे श्रमाचे प्रतिक मानले जाते. श्रमाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी 2 ऑक्टोबर हा दिवस ‘चरखा दिवस’ साजरा केला जातो. चरखा दिनाच्या औचित्याने गांधी तीर्थमध्ये अखंड सूत कताई सुद्धा करण्यात येणार आहे. या दिवशी गांधीतीर्थला भेट देण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना देखील या सूतकताईमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय एकांकीका स्पर्धेच्या विजेत्याबाबत उत्कंठा यावर्षी महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दोन गटाकरीता विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी प्रथमच भरघोस रक्कम पारितोषिके असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एकांकीका स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गट मिळून एकूण 1261 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. निवड समितीच्या सदस्य, परीक्षकांनी पात्र 65 एकांकीका व्हिडीओंची निवड केली. त्यातील 5 वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या गटातून 40 एकांकीका तर 11 वी ते खुल्या गटासाठी 25 एकांकीका स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. त्या सर्व 65 एकांकीका व्हीडीओला गांधी तीर्थच्या सोशल मीडियाच्या लाईक्स मूल्यांकनासाठी (पब्लिक पोल) ठेवल्या होत्या. मिळालेल्या लाईक्स व परीक्षकांचा निर्णय विचारात घेऊन विजेते ठरविण्यात येणार आहेत. भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. त्यातील विजेत्यांची घोषणाही होणार आहे. या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here