प्रतिशोधाच्या चक्रव्युहात समीर पुरेपुर फसला!- धम्माला मारुन भावाच्या हत्येचा घेतला बदला!!

जळगाव : सतरा वर्षाचा मोहम्मद कैफ भुसावळ शहरातील पंचशील नगर भागात रहात होता. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर कपडे विकून त्याचे वडील आणि भाऊ घर संसाराचा गाडा ओढत होते. एक भाऊ रेल्वे प्लॅटफॉर्मवर ठेकेदाराच्या निगरानीखाली खाद्यपदार्थ विकून आपला चरितार्थ चालवत होता. अशा संघर्षमय परिवारात कैफ जन्माला आला होता. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी त्याच्या अंगात रग मात्र कायम होती. अल्लड वय आणि कुसंगत या घटकांचा संगम झाल्यामुळे त्याच्या अंगी टपोरीपणा आला होता. भाईगिरीची त्याला सवय जडली होती. शर्टाला पुर्ण बटने असल्यावर देखील वरची बटणे उघडी ठेवण्यात त्याला आनंद वाटत होता.  

कैफ रहात असलेल्या पंचशील नगर भागात त्याच्याच वयाचे काही तरुण देखील रहात होते. धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर, समिर बांगर, आश्विन बांगर व शुभम खंडेराव अशी त्यांची नावे होती. एके दिवशी धम्माच्या  वडीलांसोबत कैफचा कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. तो वाद शिगेला पोहोचल्यामुळे कैफने धम्माच्या वडीलांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत धम्माच्या वडीलांना जबर दुखापत झाली होती. या मारहाणप्रकरणी 18 फेब्रुवारी 2020 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्यची नोंद घेण्यात आली होती. अंथरुणाला खिळून पडलेल्या वडीलांना पाहिले म्हणजे धम्माच्या मनात कैफ विषयी चिड निर्माण होत असे.

या घटनेनंतर दिवसामागून दिवस जात होते. काळ पुढे पुढे सरकत होता. धम्माच्या मनात कैफ विषयी प्रतिशोधाची आग देखील धगधगत होती. ती धग कायम होती. कैफ समोर दिसला म्हणजे धम्माचे तरुण रक्त सळसळत होते. एके दिवशी धम्माने त्याचे मित्र समीर बांगर, अश्विन बांगर व शुभम खंडेराव यांच्यासमोर मनातील बदल्याची आग प्रकट केली. आपल्याला काहीही करुन कैफचा गेम करायचा आहे असे धम्माने त्याच्या मित्रांना म्हटले. वय कमी आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या धम्माच्या मित्रांनी त्याच्या प्रतिशोधाच्या आगीत उडी घेतली. धम्मा म्हणेल ती पुर्व दिशा असे म्हणत त्यांनी त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कैफचा काटा काढण्याचे ठरवले.

11 ऑक्टोबर 2020 रोजी कैफचे वडील व भाऊ फुटपाथवर कपडे विकून  घरी परत आले होते. रात्रीचे जेवण आटोपून ते जवळच असलेल्या मदीना मशीदजवळ बसले होते. त्याचवेळी धम्मा सुरळकर, समिर उर्फ कल्लु बांगर, आश्विन उर्फ गोलु बांगर, शुभम खंडेराव व त्यांच्यासोबत एक आनोळखी साथीदार असे सर्वजण मोहम्मद कैफच्या दिशेने धावत आले. कुणाला काही समजण्याच्या आत त्यांनी मोहम्मद कैफ यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु केली. या बेदम जिवघेण्या हल्ल्यात धम्माने त्याच्या हातातील लोखंडी रॉडच्या सहाय्याने मोहम्मद कैफ याच्या डोक्यावर मारहाण सुरु केली. या मारहाणीत कैफ जबर जखमी झाल्यानंतर मुख्य सुत्रधार धम्मा व त्याच्यासोबतचे सर्व साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाले. कैफ जागीच ठार झाला होता.

या घटनेप्रकरणी मयत कैफ याचा भाऊ समीर याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला  भाग 5 गु.र.नं.882/2020 भा.द.वि. 302, 323, 506, 143, 148, 149 नुसार दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपासात या गुन्हांतील मुख्य आरोपी धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर व त्याचे साथीदार समीर उर्फ कल्लु अजय बांगर, आश्विन उर्फ गोलु अजय बांगर, शुभंम पंडीत खंडेराव या सर्वांना अटक करण्यात आली. अटकेनंतर न्यायालयाच्या आदेशाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आपल्या भावाचा खून करणा-या धम्मप्रिय सुरळकर याला जिवंत सोडणार नाही अशी कैफचा भाऊ समीर याने दफनविधीच्या वेळीच शपथ घेतली होती. जेलमधे गेलेला मुख्य आरोपी धम्मा जेलच्या बाहेर कधी येतो याकडे समीर बारकाईने लक्ष ठेवून होता. या गुन्ह्यातील इतर आरोपी जामीनावर बाहेर आले होते मात्र मुख्य आरोपी धम्मा अद्याप जेलमधेच होता.

11 ऑक्टोबर 2020 च्या या घटनेनंतर तब्बल अकरा महिन्यांनी 21 सप्टेबर 2021 रोजी धम्माचा जामीन होणार असल्याची कुणकुण मयत कैफचा भाऊ समीर यास लागली. त्यानंतर दुस-याच दिवशी 22 सप्टेबर रोजी धम्माचा वाढदिवस होता. त्यामुळे जामीनावर सुटलेल्या धम्माचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन त्याच्या बहिणींनी केले होते. मात्र जामीनावर सुटल्यानंतर त्याच दिवशी त्याचा गेम करण्याचे नियोजन समीर शेख याने साथीदारांच्या मदतीने केले होते. त्याने पुर्ण तयारीनिशी तसे नियोजन केले होते. धम्माचे वडील मनोहर दामू सुरळकर हे जामीनासाठी लागणारे कागदपत्र संकलित करण्याकामी लागले होते. त्यांच्या सर्व हालचालींवर समीरचे लक्ष होते.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, स.पो.नि. अनिल मोरे

21 सप्टेबर 2021 रोजी धम्मप्रिय सुरळकर याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला. जामीन मंजुर झाल्याबाबतचे कागदपत्र घेऊन मनोहर सुरळकर व त्यांचे तिघे मित्र असे चौघेजण जळगाव उप कारागृहात पोहोचले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धम्मप्रियची न्यायालयातून जामीनावर सुटका झाली. मात्र न्यायालयाच्या भिंतीआड तो सुरक्षीत होता. तो बाहेर येताच त्याला हायसे वाटले. मात्र त्याचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. समीर त्याचा काळ बनून महामार्गावर साथीदारांसह टपून बसलेला होता. धम्माच्या जिवनातील 21 सप्टेबर हा अखेरचा दिवस होता. हे केवळ नियतीलाच ठाऊक होते. दुस-याच दिवशी तो वयाच्या विशीत पदार्पन करणार होता. मात्र नियतीने त्याला विशीत जाऊ दिले नाही.

सायंकाळी चौघे जण धम्मप्रियला सोबत घेत जळगावहून भुसावळच्य दिशेने दोन मोटारसायकने घराकडे निघाले. एका मोटार सायकलवर दोघे तर दुस-या मोटार सायकलवर तिघे असे पाच जण भुसावळकडे मार्गक्रमण करत होते. वाटेत नशिराबाद गावानजीक पुलाखाली सर्व पाच जण सिगारेट ओढण्यासाठी थांबले. त्याच वेळी काही कळण्याच्या आत पलीकडून काही जण त्यांच्या दिशेने मोटार सायकलवर चाल करुन आले. आलेल्या तरुणांनी धम्मप्रिय व त्याच्या वडीलांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकली. डोळ्यात मिरचीची पुड फेकल्यामुळे दोघांचे डोळे चुरचुर करण्यास लागले. कुणालाच काही समजत नव्हते. दरम्यान दोघांनी पिस्टलने गोळीबार सुरु केला. या गोळीबारात धम्मप्रियच्या छातीत व डोक्यात गोळी लागली. जिव वाचवण्यासाठी तो काही अंतर पळाला मात्र त्याला पळून जाण्याची संधी देण्यात आली नाही. हल्लेखोर तरुणांनी त्याच्यासह त्याचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात धम्मप्रिय जागीच ठार झाला तर त्याचे वडील जखमी झाले. हा थरार बघून सुरळकर पिता पुत्रांसोबत असलेले तिघे भितीपोटी व जिवाच्या आकांताने पळून जाण्यात यशस्वी झाले.

जखमी मनोहर सुरळकर

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पोलिस पथकाने समीर व रियान त्या दोघा तरुणांना ताब्यात घेत अटक केली. यातील समीर हा कैफ याचा भाऊ आहे. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला अटकेतील दोघांना पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान अधिक तपासात तिसरा संशयीत आवेश शेख बिस्मिल्ला याला देखील अटक करण्यात आली. तिघे संशयीत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here