गळ्यात सरपंचपदाची माळ- केला अपहाराचा गाळ फरार खिलचंदची पोलिसांनी शोधूनच काढली नाळ

जळगाव : कायद्याचे हात एवढे लांब असतात की वर्दीचा कापड देखील कधी कधी कमी पडतो असे म्हटले जाते. वर्दीची सावली लपवून साध्या वेशात गुप्तहेराप्रमाणे जावून आरोपींना पकडण्याचे कसब गुन्हे शोध पथकाच्या अंगी भिनलेले असते. गेल्या पाच वर्षापासून फरार असलेल्या व ग्रामपंचायत निधीचा अपहार करणा-या नशिराबादच्या तत्कालीन सरपंच आरोपीला शोधून  अटक करण्याचे कसब जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने दाखवले आहे. खिलचंद दगडू रोटे असे या सरपंच आरोपीचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत खिलचंद दगडू रोटे हा सन 2015 मधे विजयी झाला होता. ग्रामपंचायत सदस्यत्वाची माळ गळ्यात पडल्यानंतर लवकरच खिलचंदच्या गळ्यात सरपंचपदाची दुसरी माळ देखील पडली. बी. ई. सिव्हिल पदवीप्राप्त खिलचंदच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता आली होती. सत्तारुढ खिलचंद यास भ्रष्टाचाराची लागण होण्यास वेळ लागला नाही. भ्रष्टाचार व अपहार कसा करायचा हे सांगणारे व सल्ला देणारे त्याला भेटू लागले. कमिशन, टक्केवारी, एका सहीची किंमत या गोष्टी त्याने आत्मसात केल्या.

ग्रामपंचायतीच्या शौचालय बांधण्याच्या निधीत खिलचंद याने अपहार केला. अपहारानंतर त्याच्यावर आरोप होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चेक अनादर होण्याचे प्रमाण देखील वाढले. बघता बघता भा.द.वि. 138 च्या त्याच्यावर अकरा गुन्हे दाखल झाले. आपल्यावर होत असलेले अपहाराचे आरोप, दाखल होत असलेले गुन्हे बघता तो फरार होण्यात यशस्वी झाला. सन 2017 पासून फरार झालेला खिलचंद कुणाच्याही हाती लागत नव्हता. तो कुणाला साध्या डोळ्यांनी दिसेनासा झाला.

नशिराबाद पोलिस स्टेशनचे तत्कालीन अधिका-यांनी सन 2017 मधे तपास सुरु केला होता. मात्र फरार खिलचंदचा तपास लागत नसल्यामुळे तो तपास हळूहळू थंड बस्त्यात पडला. पाच वर्ष झाले तरी खिलचंदचा थांगपत्ता कुठेही लागत नव्हता. दरम्यानच्या कालावधीत खिलचंद याने विविध गावांना नोकरी पत्करुन आपला चरितार्थ भागवला. बी.ई. सिव्हील पर्यंत शिक्षण झाले असल्यामुळे खिलचंद यास पटकन कुठेही नोकरी मिळून जात होती. नाशिकला एका कंपनीत त्याने दोन वर्ष काम केले. मात्र त्याठिकाणी नंतर त्याला पोलिस विभागाचा चारित्र पडताळणी दाखला मागण्यात आला. आपल्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे चारित्र्य पडताळणीच्या फंदात न पडण्यात त्याने धन्यता मानली. त्यानंतर त्याने नाशिक सोडले. ठाणे व कल्याण आदी ठिकाणी त्याने जॉब केला. मात्र तो कुठेही एका जागी जास्त दिवस थांबला नाही. त्याच्यावर दाखल असलेले अकरा गुन्हे हे त्यामागचे मुख्य कारण होते. बघता बघता पाच वर्षाचा कालावधी उलटला. आता आपल्याला पोलिस पकडणार नाही याची त्याला खात्री पटू लागली होती. पोलिस पथकाला तो सापडत नव्हता. कित्येकदा पोलिस पथक रिकाम्या हाती परत येत होते.

मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्याचा बारकाईने व थंड डोक्याने अभ्यास केला. पाच वर्षापासून फरार खिलचंद यास पकडण्याचा विडा त्यांनी उचलला. कधी खब-यांकडून तर कधी आपले नेटवर्क वापरुन त्यांनी फरार खिलचंदचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र या कालावधीत खिलचंद निर्धास्त झालेला होता. आता आपल्याला पोलिस पकडू शकत नाही अशी त्याची मानसिकता व खात्री झाली होती. मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागीच होती.

खिलचंद कल्याण ते ठाणे अप डाऊन करत असल्याची एक पुसटशी माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या अंधुक माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पो.हे.कॉ.जितेंद्र पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, संदीप सावळे या चौघांना मोहिमेवर रवाना केले. फरार आरोपी खिलचंद हा मुंबई, कल्याण व ठाणे परिसरात रहात असल्याची कच्ची बातमी नंतर पक्की झाली. आता याच परिसरातून गाफील खिलचंद यास ताब्यात घ्यायचे हे तपास पथकातील चौघांनी ठरवले. दहा ते बारा दिवस ते त्याच्या पाळतीवर राहू लागले. कुठलाही मागमुस नसतांना केवळ पारंपारिक माहितीच्या तपासावर त्याचा शोध सुरु होता.

अखेर पोलिस पथकाकडे असलेले वर्णन एका कल्याण – ठाणे अप डाऊन करणा-या व्यक्तीसोबत जुळून आले. ती व्यक्ती खिलचंद हाच असल्याची तपास पथकाची पक्की खात्री झाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तो आपली ओळख लपवू लागला. मात्र जितेंद्र पाटील, अकरम शेख व नितीन बाविस्कर यांच्या कडेकोट बंदोबस्तातील हालचाली त्याच्या लक्षात आल्या. त्याने आपला गुन्हा व ओळख कबुल करण्यापुर्वी एक प्रश्न विचारला. दादा….. तुम्ही माझ्यापर्यंत आलेच कसे? गेल्या पाच वर्षात पोलिस माझा तपास करु शकले नाही. मी माझे आयुष्य ओळख लपवत जगत असतांना तुम्हाला माझा शोध लागलाच कसा? असा प्रश्न त्याने पथकातील चौघांना केला.

खिलचंद यास ताब्यात घेत अटक करण्यात आली. तहान भुक, झोप, अंघोळ या घटकांचा त्याग करणा-या तपास पथकातील चौघा पोलिस सहका-यांनी खिलचंद यास पो.नि. किरणकुमार बकाले यांच्यासमोर हजर केले. ग्रामपंचायत शौचालयाच्या रकमेत अपहार करुन गेल्या पाच वर्षापासून फरार असलेल्या व आता पोलिसांच्या ताब्यातील खिलचंदने आपला गुन्हा कबुल केला. अटकेतील खिलचंद यास मुलबाळ नसल्याचे समजते. तो फरार कालावधीत तो कुठेही एका जागी स्थिर राहिला नाही. एका गावाहून दुस-या गावाला तो भरकटत राहिला. मात्र अखेर तो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागलाच. त्याच्य विरुद्ध नशिराबाद पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 37/17 नुसार गुन्हा दाखल आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here